गोल्डन आय न्यूज नेटवर्क
न्यू इंग्लिश मीडियम शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
विद्यार्थ्यांनी केले शिक्षकांचे औक्षण.!!
पुणे : शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश मीडियम शाळेतील प्रायमरी विभागात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
गुरुपौर्णिमा किंवा व्यासपूजेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने श्री शिवाजी मित्र मंडळ व साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने आज (दि. १०) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश मीडियम शाळेतील मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिक्षकांना भगवे उपरणे घालून औक्षण करत विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुदक्षिणा म्हणून गुरुचरित्र भेट देण्यात आले. गुरूंना वंदन करून विद्यार्थ्यांनी पेढाही भरविला. आईनंतर विद्यार्थ्यांचे दुसरे गुरू म्हणजे शिक्षक; जे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देतात आणि ज्ञान देण्याचे कार्यही करत असतात.
अशा गुरूंविषयी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञता व्यक्त केली.शाळेतील शिक्षिका संहिता चंदनशीव, नुपूर कुरुलकर, रूपाली कनोजे, सुवर्णा पवार, अश्विनी पटवर्धन, नॅन्सी गवारे, श्रद्धा रांजेकर आणि देविदास वाकळे आदी शिक्षकांचे पूजन करण्यात आले. मंडळाच्यावतीने गंधाली शाह, कल्पना ओव्हाळ, बंटी गोळे, नंदू ओव्हाळ आदी उपस्थित होते.
श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.