गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गायन आणि नृत्याची मैफल ठरली अविस्मरणीय..!
आयसीसीआर, भारतीय विद्या भवनतर्फे विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन तर आस्था गोडबोले-कार्लेकर यांचा नृत्याविष्कार !!
पुणे : बहुमुखी गायिका, सूरमणी विदुषी सानिया पाटणकर यांचे बहारदार गायन तर कथक नृत्यांगना व रंगकर्मी आस्था गोडबोले-कार्लेकर यांच्या चैतन्यपूर्ण, भावपूर्ण नृत्य सादरीकरणाने रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालय आणि भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सरदार महादेव बळवंत नातू सभागृह या गायन आणि नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले होते.
आयसीसीआर आणि भारतीय विद्या भवन आयोजित मैफलीत सहभागी (डावीकडून) किशोर कोरडे, सानिया पाटणकर, आदिती नगरकर, मयुरा मांगले-गांधी, श्रेयसी सबनीस, माधव लिमये.
आयसीसीआरचे विभागीय उपनिदेशक राज कुमार, भारतीय विद्या भवनचे प्रा. नंदकुमार काकिर्डे, गानवर्धन संस्थेचे सचिव रवींद्र दुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विदुषी सानिया पाटणकर यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग दुर्गामधील मध्यलय झपतालातील ‘सखी मोरी रुमझुम बादल गरजे बरसे’ या जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गुरू अश्विनी भिडे-देशपांडे यांनी रचलेल्या बंदिशीने केली. स्वर-लयीशी असलेले नाते, आवाजाची सहज फिरत, दमदार ताना असे वैशिष्ट्य दाखवत सानिया पाटणकर यांनी मैफल रंगविण्यास सुरुवात केली.
दृत लयीत ‘जय जय जय भवानी दुर्गे’ ही रचना अत्यंत ताकदीने सादर करून त्यांनी रसिकांनी मंत्रमुग्ध केले. या नंतर ‘ताना दे रे ना तन दे रे ना’ हा तराणा सादर केला. ‘सकल ब्रिज धुम मची हा हा रे’ ही होरी सादर करून गायन मैफलीची सांगता केली. किशोर कोरडे (तबला), माधव लिमये (संवादिनी), आदिती नगरकर, मयुरा मांगले-गांधी (सहगायन, तानपुरा), श्रेयसी सबनीस (तानपुरा) यांनी समर्पक साथ केली.
आयसीसीआर आणि भारतीय विद्या भवन आयोजित मैफलीत नृत्याविष्कार सादर करताना आस्था गोडबोले-कार्लेकर.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आस्था गोडबोले-कार्लेकर यांनी नृत्य सादरीकरणाची सुरुवात प्रतिभा तळेगावकर रचित ‘आदि देव महादेव’ या शिववंदनेने केली. सर्पधारी, डमरूचा निनाद करणाऱ्या, रुद्र ताल धरणाऱ्या, गौरीसह प्रकटलेल्या महादेवांचे रूप रसिकांसमोर नृत्याद्वारे उभे केले. त्यानंतर पारंपरिक तालपक्षामध्ये दुर्गा परण, आमद, गतनिकास सादर करून नृत्यातील कौशल्य दर्शविले. व्यक्तींच्या मनोभूमिका दर्शविणारी चाल (सिधी गत) प्रभावीपणे सादर केली.
तसेच कथक नृत्यातील वैशिष्ट्य असणाऱ्या घुंघट या प्रकारातील नायिकांचे विलोभनीय दर्शन घडविले. त्यानंतर श्रीकृष्णाच्या बाल, किशोर आणि युवा अवस्थेतील मोहकता दाखवत गोवर्धन लिला सादर केली. नृत्यबोल म्हणजेच पुराणकथेतील प्रसंगांचे दर्शन घडविणे होय. आस्था गोडबोले-कार्लेकर यांनी नृत्याद्वारे ग्रहा आणि विष्णूभक्त गजेंद्र यांची द्वंद्व कथा सादर केली. तसेच पखवाज बोलांसह जुलबंदीही दर्शविली.
कार्यक्रमाची सांगता करताना आनंदाची लयलूट, रंगांची उधळण करणाऱ्या होळी या सणाचे वैशिष्ट्य दाखवत आस्था यांनी पंडित केशव तळेगावकर रचित ‘होली आयी रे आयी रे’ या रचनेवर नृत्य सादर करून श्रीकृष्ण आणि गोपिकांची छेडछाड, हास्यविनोद आणि उत्कट प्रेमाचे भावविभोर दर्शन घडवून रसिकांना अचंबित केले. पंडित संजय आगळे (पखावज), अक्षय शेवडे (तबला), पूर्वा कवठेकर (पढंत), डॉ. मेधा तळेगावकर-राव (गायन), सुधीर टेकाळे (संवादिनी) यांनी साथ केली.
वसंत ऋतुतील रंगांची लयलूट, चैतन्य पालवीची लागलेली चाहूल या पार्श्वभूमीवर उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या होळीच्या वातावरणाचा आनंद रसिकांनी गायन आणि नृत्याच्या मैफलीतून भरभरून लुटला.
सुरुवातील आयसीसीआरचे विभागीय उपनिदेशक राज कुमार यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. कलकारांचा सन्मान राज कुमार व प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केला. सूत्रसंचालन अनुप्रिता लेले यांनी केले.
जाहिरात