गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘गानवर्धन’चा स्वरगंधा सांगीतिक पुरस्कार व्यास कुटुंबाला !!
15 फेब्रुवारी रोजी पुरस्काराचे वितरण
पंडित सुहास व्यास यांचे गायन तर पंडित सतीश व्यास यांच्या संतूरवादनाची मैफल !!
पुणे : अभिजात संगीताचे गेली 43 वर्षे जतन, संवर्धन करणाऱ्या गानवर्धन संस्थेतर्फे कै. स्वरगंधा टिळक स्मृती निमित्ताने दिला जाणारा नारायणराव टिळक पुरस्कृत ‘स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार’ पद्मभूषण पंडित कै. सी. आर. व्यास कुटुंबास देण्यात येणार आहे, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
शास्त्रीय संगीतात योगदान देणाऱ्या एका कुटुंबास दरवर्षी स्वरगंधा सांगीतिक पुरस्काराने सन्मानित केले जाते. पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि पंडित सुहास व्यास यांचा अमृत महोत्सव या निमित्ताने संस्थेने या वर्षी व्यास कुटुंबियांना हा पुरस्कार देण्याचा योग जुळवून आणला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता एस. एम. जोशी सभागृहात होणार असून पुरस्काराचे वितरण तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते होणार आहे. पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक वारसा पुढे नेणारे त्यांचे तीनही सुपुत्र पंडित सुहास व्यास, पंडित सतीश व्यास आणि शशी व्यास यांचा या वेळी पुरस्कार देऊन गौरव केला जणार आहे.
सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ आणि चाळीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पंडित सुहास व्यास यांचे गायन तर पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतूरवादन होणार आहे. त्यांना रामदास पळसुले, भरत कामत, सुयोग कुंडलकर यांची साथसंगत असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
पद्मभूषण पंडिस सी. आर. व्यास यांचे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदान अपूर्व आहे.
किराणा, ग्वाल्हेर, आग्रा या तीनही घराण्यांचे संस्कार त्यांच्यावर होते. संगीत रिसर्च अकादमी येथे त्यांचे ध्वनीमुद्रण संरक्षित आहे. गुरूंच्या स्मरणार्थ त्यांनी 1974 मध्ये ‘गुणीदास संगीत संमेलना’ची सुरुवात केली. त्यांच्या बंदिशींचे ‘राग सरिता’ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
प्रसिद्ध गायक पंडित सुहास व्यास आणि प्रसिद्ध संतूरवादक पद्मश्री पंडित सतीश व्यास हे पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक वारसा पुढे नेत आहेत तर शशी व्यास यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 1996 मध्ये ‘पंचमनिषाद’ संस्थेची स्थापना केली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून ते देशभरात अनेक ठिकाणी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करीत आहेत.
जाहिरात