गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बुद्ध जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ भेट उपक्रम !!
पाली व बौद्ध अध्ययन विभागात उपक्रम !!
पुणे : बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभाग आणि तथागत प्रेरणा पब्लिक ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील संदर्भतज्ज्ञ व ग्रंथप्रसारक आयु. प्रसाद भडसावळे यांच्या प्रयत्नातून प्राप्त विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन व पुस्तक भेट उपक्रम संपन्न झाला.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभागप्रमुख प्रा. महेश देवकर, प्रसाद भडसावळे, पाली अभ्यासक प्रा. रितेश ओव्हाळ, राजश्री मोहाडीकर, तलत परवीन, प्रणाली वैंगणकर, तृप्तीराणी तायडे, शिला डोंगरे, प्रज्वला भिंगारे, बाबासाहेब गायकवाड, कैलास वंजारे, संभाजी साळवे, उत्तम साळवे, भगवान धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बुद्ध जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली विभागात आयोऊ ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथभेट उपक्रमात सहभागी पाली विभाग प्रमुख महेश देवकर, ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे, पाली अभ्यासक रितेश ओव्हाळ तसेच तथागत प्रेरणा पब्लिक ट्रस्टचे पदाधिकारी
प्रदर्शनात पाली भाषा, बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृती, साहित्य व समकालीन विचारधारा यांसारख्या विविध विषयांवरील सुमारे ३५० पुस्तकांचा समावेश होता. प्रदर्शनातील ग्रंथ पाली विभागातील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना भेट म्हणून प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे म्हणाले,.
‘विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक आणि बौद्ध साहित्यप्रेमींनी या ज्ञानसोहळ्याला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, तथागत बुद्धांचे विचार, पाली साहित्य आणि समृद्ध बौद्ध परंपरेचा अनुभव घेण्याची आगळीवेगळी संधी ग्रंथप्रेमींना उपलब्ध झाली. बदलत्या जीवनशैलीत तथागत बुद्धांचे आचार-विचार पुन्हा नव्याने अंगीकारण्याची गरज आहे.’
याप्रसंगी महेश देवकर, रितेश ओव्हाळ यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी उपस्थितांनी अशा उपक्रमांद्वारे ज्ञानप्रसाराची परंपरा पुढे चालविण्याचा संकल्प व्यक्त केला.