Marathi FM Radio
Friday, December 5, 2025

गानवर्धन संस्थेतर्फे कृ. गो. धर्माधिकारी स्मृती संगीतसंवर्धक पुरस्काराने आलापिनी जोशी यांचा गौरव !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

सुगम, कराओकेत रमलेल्यांना शास्त्रीय संगीताची गोडी लावण्याचा प्रयत्न

आलापिनी जोशी यांचे प्रतिपादन
गानवर्धन संस्थेतर्फे कृ. गो. धर्माधिकारी स्मृती संगीतसंवर्धक पुरस्काराने आलापिनी जोशी यांचा गौरव !!

पुणे : आईकडून मिळालेला सांगीतिक वारसा आणि गुरुंकडून मिळालेली कला मी आजवर जोपासत आले आहे. ‌‘इदं न मम‌’ या भावनेतून गानवर्धन संस्थेचा पुरस्कार स्वीकारत आहे, अशा भावना व्यक्त करून सुगमसंगीत, कराओके आणि लावणीत रमलेल्या मुलांमध्ये अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या संचालिका आलापिनी जोशी यांनी केले.

Advertisement

Advertisement

गानवर्धन संस्था आयोजित संगीतसंवर्धक पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) शारंग नातू, दयानंद घोटकर, डॉ. माधुरी डोंगरे, आलापिनी जोशी, डॉ.निलिमा राडकर, सविता हर्षे, डॉ. राजश्री महाजनी.

Advertisement

गानवर्धन संस्थेचे संस्थापक कै. कृ. गो. धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या संगीतसंवर्धक पुरस्काराने कराड येथील स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या संचालिका आलापिनी जोशी यांचा आज (दि. 10) सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ गुरू व विचारवंत डॉ. माधुरी डोंगरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना जोशी बोलत होत्या.

Advertisement

गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, उपाध्यक्ष डॉ. निलिमा राडकर, कोषाध्यक्ष सविता हर्षे, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू आदी मंचावर होते. अमेरिकास्थित सुधीर धर्माधिकारी आणि सविता हर्षे हे या पुस्काराचे प्रायोजक आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 21 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रम सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

जोशी पुढे म्हणाल्या, स्वरनिर्झर संस्थेच्या माध्यमातून संगीत आणि संगीताला पूरक अशा विविध कलांचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना फक्त परिक्षार्थी न बनविता त्यांची कला रसिकांपर्यंत पोहोचावी या करीता संगीत सभांचे आयोजन केले जात आहे. ज्ञानदानाचा घेतलेला हा वसा या पुरस्काराच्या प्रेरणेतून अधिक जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न राहिल.

आशीर्वादपर मार्गदर्शन करताना डॉ. माधुरी डोंगरे म्हणाल्या, अभिजात शास्त्रीय संगीताचे संवर्धन करणाऱ्या संस्थेकडून दिला जाणारा हा पुरस्कार गुरू भगिनीला देताना आनंद होत आहे. शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करण्याचा ध्यास घेऊन तळमळ व निष्ठेने आम्ही सर्वजण कार्य करीत आहोत.

सुरुवातीस सविता हर्षे पुरस्काराविषयी माहिती विशद केली. तर दयानंद घोटकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. स्वरनिर्झर संस्थेच्या माध्यमातून कराड आणि आजूबाजूच्या परिसरातील रसिकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले आहे, असे सांगितले. मानपत्राचे वाचन कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे यांनी केले. सूत्रसंचालन सविता हर्षे यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आलापिनी जोशी यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी मैफलीची सुरुवात खमाज अंगाचा राग धनाश्री सादर करताना पारंपरिक विलंबित ‌‘हे म्हारो राजेंद्र‌’ हा ख्याल सादर केला तर त्याला जोडून ‌‘तेरो ध्यान धरत‌’ द्रुत ख्याल सादर करताना सुरुवातीस आग्रा घराण्याची ‌‘नोम्‌‍ तोम्‌‍‌’ ही आलापी प्रभावीपणे सादर केली.

यानंतर ‌‘जा जा रे जा पथिकवा‌’ ही राग मधुकंसमधील अध्धा तीन तालातील बंदिश सादर केली. तसेच गुरू डॉ. सुधा पटवर्धन यांनी रचलेला ‌‘तनन तान देरे ना‌’ हा तराणा सादर केला. संत कान्होपात्रा नाटकातील ‌‘पतित तू पावना‌’ हे पद सादर केल्यानंतर मैफलीची सांगता.

‌‘अलय्या नामे तरला..‌’ या भैरवीने केली. सुमधूर गायन, दमदार आवाजातील सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. जोशी यांच्या मैफलीपूर्वी त्यांच्या शिष्या स्वागता पोतनीस यांनी राग पूरिया कल्याणमधील ‌‘आज सो बना‌’ हा विलंबित ख्याल आणि ‌‘चरण तुमरे अब‌’ हा द्रुत ख्याल सादर केला. समीर मोडक (तबला), मीनल नांदेडकर (संवादिनी), साक्षी कालवडेकर, स्वागता पोतनीस (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular