गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संस्था व व्यक्ती एकमेकांमुळे घडतात : भूषण कटककर !!
करम प्रतिष्ठानच्या शंभराव्या कार्यक्रमात कवयित्री कांचन सावंत यांचा काव्यतेज पुरस्काराने गौरव !!
पुणे : साहित्यिक संस्थांची उभारणी साहित्यिकांकडून घडते, नंतर त्या संस्थांमुळे नवसाहित्यिक घडतात. संस्थात्मक कार्यासाठी सातत्य, मनुष्यबळ व इच्छाशक्ती अत्यंत गरजेच्या आहेत. एकट्या साहित्यिकाला समाजाभिमुख होण्यात अडचणी येऊ शकतात, मात्र संस्थेच्या पाठबळाने तो सकस निर्मिती करतो व आत्मविश्वासाने सामाजिक प्रवाहांना सामोरा जातो, असे प्रतिपादन करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांनी केले.
करम प्रतिष्ठान आयोजित काव्यतेज पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) म. भा. चव्हाण, भूषण कटककर, कांचन सावंत, शिरीष चिटणीस, ॲड. प्रमोद आडकर, मालती काळभोर.
करम प्रतिष्ठानचा शंभरावा कार्यक्रम रविवारी (दि. 28) कोथरूडमधील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कटककर बोलत होते. ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, शिरीष चिटणीस, मालती काळभोर, करम प्रतिष्ठानच्या वर्षा कुलकर्णी, प्रज्ञा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्व. सुप्रिया जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
कविता हा सर्वांना जोडणारा धागा आहे. करम प्रतिष्ठानने केवळ साहित्यिक, कवी यांना व्यासपीठ मिळवून दिले नाही तर कवींमधील रसिकता जाणली, त्यांच्यात संस्कारमूल्येही रुजविली, अशा भावना करम प्रतिष्ठानच्या मंचावरून नावारूपाला आलेल्या कवी, सुहृदांनी व्यक्त केल्या. योगिनी जोशी म्हणाल्या, करम प्रतिष्ठानच्या मंचावर रसिकता जपली जाते.
कवितांच्या रसग्रहणासारखे उपक्रम स्तुत्य आहेत. सुजाता पवार म्हणाल्या, कविता हा सर्वांना जोडणारा धागा आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती करम प्रतिष्ठानमुळे जोडल्या गेल्या आहेत. मैत्री आणि मानवतेवर प्रेम करणारी करम ही संस्था असल्याचे चंचल काळे म्हणाल्या.
स्वाती सामक, कैलास गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेच्या कार्याचा गौरव करून ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, काव्य-साहित्य क्षेत्रातील तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन करम प्रतिष्ठान नवोदितांना योग्य मार्ग दाखवित आहे. समाजसेवा करणाऱ्या संस्था-व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करणे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे स्मीता जोशी म्हणाल्या.
वैजयंती आपटे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. पुरस्कारार्थींच्या नावाची घोषणा प्राजक्ता वेदपाठक यांनी तर परिचय वासंती वैद्य यांनी करून दिला. सूत्रसंचालन मुक्ता भुजबले, निरुपमा महाजन यांनी केले. आभार वर्षा कुलकर्णी यांनी मानले.
करम काव्यतेज पुरस्काराने कवयित्री कांचन सावंत यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण शिरीष चिटणीस यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना चिटणीस म्हणाले, करम प्रतिष्ठानच्या मंचावर आलेला कवी, साहित्यिक समृद्ध होतो. नव्या पिढीसाठी करम प्रतिष्ठान अभ्यासाचे केंद्र आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना कांचन सावंत म्हणाल्या, करम प्रतिष्ठानमुळे कवितेविषयची गोडी वाढली, आत्मभान मिळाले. काव्यासंदर्भातील विचार सशक्तपणे मांडता आले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन देवेंद्र जोशी यांनी केले. मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी तर परिचय वैजयंती आपटे यांनी करून दिला.
——————————————- ——————
जाहिरात