गोल्डन आय न्यूज नेटवर्क
महामाता रमाई महोत्सवाचे 1 फेब्रुवारीपासून आयोजन !!
पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीचे औचित्य साधून दि. 1 ते दि. 7 फेब्रुवारी या कालावधीत महामाता रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
लोकसहभागातून होणारा महोत्सव महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळात होणार आहे. रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन ईटकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
महोत्सवाचे उद्घाटन दि. 1 रोजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दि. 2 रोजी रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार शांताराम जावळे यांना ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. दि. 3 रोजी सन्मान रमाईंच्या लेकींचा या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रातील महिलांचा काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाच्या मुख्य निमंत्रक प्रियंका रणपिसे यांच्या उपस्थितीत सन्मान केला जाणार आहे.
दि. 4 रोजी सायंकाळी 5 वाजता मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती या विषयावर डॉ. दत्ता कोहिनकर मार्गदर्शन करणार आहेत. अक्षरा इंटरनॅशलन स्कूलच्या अध्यक्षा ज्योती राठोर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 7 वाजता कवी आकाश सोनवणे व सहकाऱ्यांचा देश आमचा देव नाही, देह आहे तरी आम्ही बोलू नये हा कार्यक्रम होणार आहे.
दि. 5 रोजी मानवी कल्याणासाठी बौद्ध धम्म या विषयावर भदन्त विमलकित्ती गुरसिरी याचे प्रवचन होणार आहे. दि. 6 रोजी आडकर फौंडेशनच्या सहकार्याने एकपात्री कलावंत बंडा जोशी यांचा हास्यपंचमी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जोशी यांच्या एकपात्री कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
महोत्सवाचा समारोप व रमाईरत्न पुरस्कार वितरण समारंभ दि. 7 रोजी लोकमान्य समूहाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. बालभारतीचे संपादक किरण केंद्रे व गायिका सुषमादेवी यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
जाहिरात