गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संगीत ही माणसामाणसांना जोडणारी कला : सुबोध भावे !!
सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय देशपांडे यांचा स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानतर्फे सन्मान !
पुणे : संगीत कला माणसामाणसातील भेदांपलिकडे एकमेकांवर प्रेम करायला, एकमेकांना जोडायला शिकविते. संगीत समजण्यासाठी भाषा येण्याची गरज नसते. नाट्यसंगीत हे शास्त्रीय संगीत अथवा बंदिशींना खूप सोप्या पद्धतीने नाटकाच्या प्रवाहीपणात झोकून देण्यासाठी बनविलेले संगीत आहे.
मराठी नाटक सर्वदूर पोहोचविण्याचे काम संगीत नाटकाशी संबंधित दिग्गज कलावंतांनी केले आहे. त्यांच्या मेहनतीची फळे आज आम्ही चाखत आहोत, अशा भावना सुप्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय हरिभाऊ देशपांडे यांची पंचाहत्तरी आणि सांगीतिक क्षेत्रातील सहा दशकांच्या प्रवासाबद्दल स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानतर्फे देशपांडे यांचा विशेष सत्कार भावे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी सहस्रबुद्धे होत्या. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते.
स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान आयोजित सत्कार समारंभात (डावीकडून) सुचेता अवचट, चारुशीला केळकर, माधुरी सहस्रबुद्धे, सुबोध भावे, संजय हरिभाऊ देशपांडे, भावना देशपांडे.
जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चारुशीला केळकर, उपाध्यक्षा सुचेता अवचट, भावना देशपांडे, अनिल देशपांडे, विष्णू देशपांडे मंचावर होते. प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांची विशेष उपस्थिती होती.
माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, प्रत्येकाने एखादी कला जोपासली पाहिजे, कारण कलेत सकारात्मकतेची ताकद आहे. कलेत रमले गेले की नकारात्मक विचारांचा विसर पडतो आणि ध्यानाचा आनंद मिळतो. संगीत नाटक पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान करीत असलेल्या कार्याचा सहस्रबुद्धे यांनी गौरव केला.
सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ तबलावादक अनिल हरिभाऊ देशपांडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार चारुशीला केळकर, सुचेता अवचट यांनी केला. संस्थेच्या उपक्रमांची माहिती आशा करवंदे यांनी प्रास्ताविकात सांगितली.
उत्तरार्धात ‘सूर अमृताचे’ या कार्यक्रमात संजय हरिभाऊ देशपांडे यांचे सुरेल ऑर्गन वादन झाले.
त्यांनी ‘मम आत्मा गमला’, गंधर्व पद्धतीच्या चालीनुसार ‘चंद्रिका ही जणू’ ऑर्गनवर सादर केल्यानंतर बालगंधर्व गात असत त्या ‘पुष्प पराग सुगंधित’ या पदाने त्यांनी सादरीकरणाची सांगता केली. त्यांना प्रशांत पांडव (तबला) यांनी समर्पक साथ केली. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक रवींद्र खरे यांनी संजय हरिभाऊ देशपांडे यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान बालवयात बालगंधर्व यांच्या समोर ऑर्गन वादनाची मिळालेली संधी, वादन ऐकून बालगंधर्व यांनी साथीला बोलविल्याचा किस्सा सांगितला.
पंडित भीमसेन जोशी, रामदास कामत, जयराम-जयमाला शिलेदार, वसंतराव देशपांडे, इंदिराबाई खाडिलकर यांच्यासह नामवंत कलाकारांना ऑर्गनची साथ करताना त्या त्या गायकाच्या गायनशैलीनुसार कशी साथ केली या आठवणींना उजाळा दिला.
संजय देशपांडे यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे नाट्यसंगीताचे प्राथमिक शिक्षण घेतलेले आनंद भाटे यांनी ‘सुखालागी करिसी तळमळ’ हा संत नामदेव रचित अभंग सादर केला.
जाहिरात