गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दिग्गज कलाकारांचे ‘स्वरकुला’तील शिष्यांना शुभाशीर्वाद
उस्ताद मोही बहाउद्दीन डागर आणि पंडित उदय भवाळकर यांची रंगली मैफल !!
पुणे : उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील अती प्राचिन धृपद गायन परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवून ही धृपदची परंपरा प्रवाहित ठेवण्याच्या उद्देशाने जगप्रसिद्ध धृपद गायक पंडित उदय भवाळकर यांच्या ‘स्वरकुल’ या गुरुकुलास शास्त्रीय गायन-वादन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी भेट देऊन शिष्यांना शुभाशीर्वाद दिले.
या ‘स्वरकुला’च्या शुभारंभानिमित्ताने रुद्रवीणा वादक उस्ताद मोही बहाउद्दीन डागर आणि पंडित उदय भवाळकर यांची मैफल रंगली. या प्रसंगी शिष्यवर्गाचे सादरीकरणही झाले.
गुरू ते शिष्य हा एक ज्ञानाचा प्रवास आहे; ज्यातून शिष्यातील कलात्मक गुण वृद्धींगत होतात. गेल्या 40 वर्षांमध्ये धृपद शिकण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. धृपद संगीताचे पावित्र्य राखले जावे आणि या परंपरेचे संवर्धन व्हावे हा ‘स्वरकुल’चा मुख्य उद्देश आहे. ही विद्या वर्गामध्ये बसून दिली जाऊ शकत नाही तर गुरूच्या सहवासात दीर्घकाळ राहूनच आत्मसात करता येते, असे पंडित उदय भवाळकर यांनी सांगितले.
गिरीश दोशी यांनी कलात्मक पद्धतीने बावधन येथे ‘स्वरकुल’ ही वास्तू साकारलेली आहे.पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, गुरुमध्ये आवश्यक असणारे ज्ञान, शिकविण्याची इच्छा आणि तळमळ हे तीनही गुण पंडित भवाळकर यांच्याकडे आहेत. ‘स्वरकुल’ हे नावही अतिशय समर्पक आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उस्ताद झाकीर हुसेन म्हणाले, धृपद गायकीचा ठेवा, परंपरा गुरूंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे.
धृपद गायकीचा वारसा तुम्हाला प्रवाहित ठेवायचा आहे.
‘स्वरकुल’ या गुरुकुलातून उत्तम विद्यार्थी घडतील आणि कलाक्षेत्रात आपले नाव कमावतील. पंडित उदय भवाळकर उत्तम धृपद गायक घडवतील असा विश्वास पंडित उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केला.
पंडित अजय चक्रवर्ती म्हणाले, रागसंगीताचे रहस्य धृपद गायनत दडलेले आहे. शुद्ध धृपद गायनाची परंपरा टिकवून ठेवून पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित करण्याची ताकद पंडित उदय भवाळकर यांच्यात आहे.
धृपद गायकी कालतीत आहे. ही गायकी काळाच्या बंधनात बांधलेली नाही. धृपद गायन हे अनंताशी संवाद साधणारे आहे. पुण्यात धृपद गायकीचे शिक्षण देण्यासाठी पंडित भवाळकर यांनी गुरुकुल स्थापन केले याचा खूप आनंद आणि अभिमान आहे, असे अशोक वाजपेयी म्हणाले. वाजपेयी यांनी भोपाळ येथे भारत भवन आणि धृपद केंद्राची स्थापना केली आहे.
भवाळकर यांनी वयाच्या 15व्या वर्षी येथे गायन प्रशिक्षणाची केलेली सुरुवात आणि नंतरचा प्रवास यांचे वाजपेयी साक्षिदार आहेत.पंडित सुहास व्यास म्हणाले, स्वरकुलातून निघणारे सूर सर्वत्र निनादत राहतील. पंडित भवाळकर उत्तम धृपद गायक घडवतील.
जयंत जोशी म्हणाले, कलेचे प्रगल्भ-तरल अस्तित्व, तिची गंभीरता, खोली आणि उदात्तता जाणवून देण्याकरता धृपद संगीताचे अस्तित्व आहे. चैतन्य संकल्पनेचा निराकार तसेच जगण्यासाठी शांती आणि स्थिरता यांचे महत्व विशद करण्यासाठी धृपद गायनाचा अविष्कार आहे. या स्वरकुलात कलेचे नवनवे साक्षात्कार घडोत.
गुरू-शिष्य परंपरेवर विश्वास ठेवणारा कलाकारच गुरुकुल निर्माण करू शकतो. जो कलाकार साधना करतो आणि आपले ज्ञान शिष्याला देऊ इच्छितो तो स्वरकुलासारखी वास्तू निर्माण करतो. या कार्यासाठी उदयजींना लाभलेली ज्योती ताईंची साथ मोलाची आहे, असे गौरवोद्गार विदुषी मंजुषा पाटील यांनी काढले.
जाहिरात