गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुण्याच्या श्रीराम पथकाचा ढोल-ताशा निनादला अयोध्यात
राम मंदिर परिसरात श्रीराम नामाचा गजर : 150 वादकांना मिळाली संधी
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांवरील विशेष रचना, श्रीराम नामाचा गजर ढोल-ताशाच्या निनादात गुंफून तयार केलेला अनोखा ताल सादर करून पुण्याच्या श्रीराम पथकाने अयोध्यानगरी आज (दि. 25) दणाणून सोडली. राम मंदिर परिसरात ढोल-ताशाचे वादन करत पथकातल्या दिडशे वादकांनी आपली वादनसेवा श्रीरामाच्या चरणी अर्पण केली.
पथकाच्या वादनाने मंदिर परिसरात जमलेले हजारो भाविक ढोल-ताशांच्या गजरात समरसतेने ताल धरताना दिसून आले.पुण्यातील श्रीराम पथकाला अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले होते.
त्याप्रमाणे पथकातील दिडशे वादक 50 ढोल, 25 ताशे व 11 ध्वज अशा वाद्यांसह अयोध्येत दाखल झाले. आज (दि. 25) दुपारी त्यांना वादन करण्याची संधी मिळाली. राम जन्मभूमी न्यासाचे महासचिव चंपत राय, कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत वादनाला सुरूवात झाली. गोविंददेव गिरी यांच्या हस्ते पथकातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
अयोध्येत सादरीकरणासाठी बसवलेल्या श्रीराम नामावर आधारित खास तालाने वादनाला सुरूवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करणाऱ्या कवी भूषण यांच्या रचना ढोल-ताशाच्या तालात गुंफून अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली रचनाही वादकांनी सादर केली. यानंतर उज्जैनमधील महाकाल मंदिरात आरतीच्यावेळी वाजविला जाणारा तालही ढोल-ताशावर सादर करण्यात आला.
अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणासाठी देशाच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत वादनाचा आनंद घेतला. महाराष्ट्राबाहेरील भाविकांनी वादन आवडल्याच्या प्रतिक्रिया आवर्जून दिल्या, असे पथकाचे अध्यक्ष विलास शिगवण यांनी सांगितले.
काशी विश्वेश्वरातही रंगणार वादन
श्रीराम पथकाचे वादक शनिवारी (दि. 27) काशी विश्वेश्वराच्या मंदिरातही वादन सेवा देणार आहेत. मंदिर प्रशासनाने त्यांना वादनाची परवानगी दिली आहे. काशीच्या प्रसिद्ध कॉरिडॉरमध्ये ढोल-ताशांचा गजर करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे श्रीराम पथकाच्या वादकांनी सांगितले.
स्वप्न पूर्ण झाले
25 वर्षांपूर्वी श्रीराम पथकाची सुरूवात झाली. त्यानंतर काही वर्षातच माझ्यासह काही स्वयंसेवक या पथकाचा भाग झाले. रामजन्मभूमीचे आंदोलन आम्ही पाहिले. अयोध्येत श्रीराम मंदिराची निर्मिती होईल आणि आपण तिथे ढोल-ताशा वादन सेवा करू शकू याची खात्री होती. अखेर हे स्वप्न आज पूर्ण झाले, असे मनोगत पथकाचे पदाधिकारी अश्विन देवळाणकर यांनी व्यक्त केले.
— —– — ——————– — ———————–
जाहिरात