‘गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अद्वैती सुरावली’तून भक्तीरसाची अनुभूती
श्रीमद् आद्य शंकराचार्य विरचित स्तोत्रांचे भावपूर्ण सादरीकरण !!
पुणे : श्रीमद् आद्य शंकराचार्य यांची जन्मकथा आणि त्यांनी केलेले कार्य विशद करत ‘अद्वैती सुरावली’ या सांगीतिक कार्यक्रमातून आद्य शंकराचार्य यांनी रचलेली संस्कृत भाषेतील अनेक स्तोत्रे अत्यंत सुरेल, रसाळ आणि शुद्ध वाणीत रसिकांना आज अनुभवायला मिळाली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘अद्वैती सुरावली’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे! पूना गेस्ट हाऊस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वृंदा शिंगणापूरकर आणि शर्वरी लेले यांनी गायन सेवा सादर केली तर देवेंद्र तुळशीबागवाले (तबला), प्रसाद आपटे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. मीनल तुळशीबागवाले यांनी निरूपण केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमद् आद्य शंकराचार्य यांनी रचलेल्या ‘मुदा करात्तमोदकं सदा विमुक्तीसाधकं’ या महागणेश पंचरत्न स्तोत्राने करण्यात आली. गुरू महिमा वर्णन करणारे ‘शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं’ हे गुरू अष्टक अतिशय प्रभावीपणे सादर केले. ‘चिदानंदरूप: शिवोहम् शिवोहम्’ हे निर्वाण अष्टक सादर करताना आपल्यातील अहंभाव नाहीसा व्हावा आणि स्व-स्वरूपाची ओळख व्हावी हा अर्थ सहजतेने उलगडला गेला.
सुवर्णमाला स्तुती स्तोत्र सादर करताना भगवान शिवाचे माहात्म्य दर्शविले गेले. श्रीमद् आद्य शंकराचार्य यांनी समाजाला शिकवण देताना कर्तव्यात पळवाटा न शोधता वेळ मिळेल तेव्हा देवाचे नाम घ्या असा संदेश दिला. यावर रचित ‘भज गोविंदम् भज गोविंदम्,भज गोविंदम् मूढमते’ हे स्तोत्र सादर करत गोविंदाच्या नामघोषात भाविकांना सामावून घेतले.अन्नपूर्णा देवीचे महत्त्व विशद करताना श्रीमद् आद्य शंकराचार्य यांनी रचलेले अन्नपूर्णा स्तोत्र तसेच लक्ष्मी नरसिंह स्तोत्र सादर केले.
भगवान कृष्णाची महती सांगणारे गोविंदाष्टक स्तोत्र सादर करून कार्यक्रमाची सांगता ‘अच्युतम् केशवम् राम नारायणम्’ या अच्युताष्टकाने करण्यात आली. श्रीमद् आद्य शंकराचार्य विरचित स्तोत्रांना वृंदा शिंगणापूरकर यांनी स्वरबद्ध केले आहे. या स्तोत्रांच्या माध्यमातून निर्माण झालेले भक्तीरसपूर्ण वातावरण भाविकांना अनोख्या अनुभूतीत घेऊन गेले. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले.