गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्रीरामाच्या जयघोषात श्रीराम पथकातील वाद्यांचे पूजन !
अयोध्येत वादन करण्याच्या मिळालेल्या संधीचा श्रीराम पथकाने पुणेकरांबरोबर साजरा केला आनंद !!
पुणे : शाळकरी विद्यार्थ्यांनी साकारलेले रामायणातील भावपूर्ण प्रसंग आणि हजारो अबालवृद्ध पुणेकरांनी केलेला श्री रामाचा जयघोष अशा भक्तिपूर्ण वातावरणात श्रीराम पथकातील ढोल-ताशाचे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने प. पू. शंकराचार्य विद्यानृसिंहभारती (स्वामी संकेश्वर पीठ) आणि स्वामी महंत 108 श्री. जनेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
वाद्यपूजन प्रसंगी उपस्थित प. पू. शंकराचार्य विद्यानृसिंहभारती (स्वामी संकेश्वर पीठ), स्वामी महंत 108 श्री. जनेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी तसेच चंद्रशेखर बावनकुळे, धीरज घाटे आदी.
पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात गेल्या 25 वर्षांपासून ढोल-ताशाचे वादन करत महाराष्ट्राची संस्कृती जोपासणाऱ्या श्रीराम पथकाला अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत ढोल-ताशा वादन करण्याची संधी मिळाली आहे. याचे निमित्त साधून पुणेकरांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या आनंद सोहळ्यात वाद्यपूजन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे हा सोहळा झाला.
वाद्यपूजनानंतर श्रीराम पथकाने वादन सादर केले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुनील देवधर, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सुनील कांबळे, रवींद्र धंगेकर तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत पथकाचे अध्यक्ष विलास शिरवड, शिरीष चांदोरकर, पंकज वर्तक आदींनी केले. श्रीराम पथकातील पदाधिकारी अश्विन देवळणकर, ओंकार टिळेकर, विलास भिगवण यांचा सत्कार बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री रामजन्मभूमी न्यासाकडून श्रीराम पथकाला अयोध्या येथे ढोल-ताशा वादन करण्याचे आमंत्रण मिळाले असून महाराष्ट्राच्या, पुण्याच्या संस्कृतीचे अयोध्येत प्रदर्शन करून श्रीराम पथक ढोलताशा वादनाने रामलल्लाच्या चरणी आपली सेवा अर्पण करणार आहे. याच बरोबर पथकाला काशी विश्वेश्वर येथील मंदिराच्या परिसरातही वादन करण्याची संधी देण्यात आली आहे.
सुरुवातीस डीईएस इंग्लिश स्कूलमधील चार ते सात वयोगटातील मुलांनी रामायणातील प्रसंग साभिनय सादर केले. मुलांच्या सादरीकरणाला पुणेकरांनी भरभरून दाद दिली.
स्वामी महंत 108 श्री. जनेश्वरानंद गिरीजी महाराज या वेळी बोलताना म्हणाले, प्रत्येक भारतीच्या मनात श्रीरामविषयी ज्योत प्रज्वलीत झाली आहे. कुठल्याही विघातक शक्तीला विरोध करण्यासाठी हिंदू समाज एकवटलेला आहे. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. ते पुढे म्हणाले, श्रीराम पथकाला अयोध्येत श्री रामाच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळाली आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रभू श्रीरामाचे पथकाला निश्चित आशीर्वाद मिळतील.
सुरुवातीस सौरभ हेर्लेकर यांनी प्रास्ताविकात श्रीराम पथकाच्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा ओके यांनी केले तर आभार नचिकेत फडके यांनी मानले.
—————————————-–———————
जाहिरात