गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बहुस्तरात्मक बालसाहित्य असेल तरच ते टिकते : राजीव तांबे !
कवी राजन लाखे लिखित ‘ढब्बू ढेरपोट्या’ बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन!!
पुणे : मूल जेव्हा बालसाहित्य वाचते तेव्हा त्याला ते भावलेले असते. काही वर्षांनंतर तेच साहित्य वाचनात आल्यानंतर त्यातील न उलगडलेले संदर्भही त्याला कळायला लागतात. बालसाहित्य बहुस्तरात्मक असेल तरच ते टिकते. काही पुस्तकांवर एक्सपायरी डेट छापावी असे काही वेळा वाटते, अशी मार्मिक टिप्पणी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केली.
ढब्बू ढेरपोट्या’ बालकाव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) बालकांसह संतोष घुले, उदय पाटील, शिरीष चिटणीस, राजन लाखे, राजीव तांबे, डॉ. न. म. जोशी, डॉ. संगीता बर्वे, ल. म. कडू.
प्रसिद्ध कवी राजन लाखे यांच्या ‘ढब्बू ढेरपोट्या’ या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन आज (दि. 13) तांबे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री डॉ. संगीता बर्वे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यकार ल. म. कडू, कवी राजन लाखे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस व्यासपीठावर होते.
ज्ञानगंगा प्रकाशनने बालकाव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
तांबे पुढे म्हणाले, बालसाहित्य लिखाण म्हणजे फक्त मुलांना घडविणे हा उद्देश नाही तर बालसाहित्यातून मुलांमध्ये शिक्षण-प्रशिक्षणाविषयी सजगता निर्माण होत आहे का हे पाहण्याची आवश्यकता आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. न. म. जोशी म्हणाले, लहान मूल किंवा मोठ्या व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियेत फरक असतो असे नाही. मोठी व्यक्ती विचार करू शकत नाही असे विचारही मुले करतात. बालसाहित्यातून मुलांची निरिक्षण, विचारशक्ती वाढीस लागणे महत्त्वाचे आहे. जीवनाचा अर्थ सांगणारे लय, सूर आणि ताल ज्यात आहे ते खऱ्या अर्थाने बालवाङ्मय.
काव्य आणि त्या खाली तात्पर्य अशा पद्धतीने केलेली बालकाव्यसंग्रहाची मांडणी विलक्षण असल्याची भावना ल. म. कडू यांनी व्यक्त केली.
मुले साहित्य वाचनाकडे आकर्षित होत आहे ही आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, मुले इंग्रजी माध्यमात जरी शिकत असली तरी त्यांना मराठी वाचनासाठी पालक उद्युक्त करीत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक लहान मुलांसाठी लिखाण करीत आहेत ही साहित्य क्षेत्राच्या, मराठी भाषेच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे.
बालकाव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभानिमित्त बालकांनी काव्याविष्कार सादर केला.
पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका मांडताना राजन लाखे म्हणाले, मुलांमध्ये रमणे आणि निरागस बालपण अनुभवणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. या भिन्न-भिन्न गोष्टींमध्ये आनंदाची झारी होऊन जगता आले पाहिजे. तोच प्रयत्न बालकाव्यसंग्रहात केला आहे. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत राजन लाखे, शिरीष चिटणीस, किशोर सरपोतदार, विजय मोहारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले.
जाहिरात