गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्रीराम पथकाचे अयोध्येत होणार ढोल-ताशा वादन
पुण्यात रविवारी वाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन !!
पुणे : पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात गेल्या 25 वर्षांपासून ढोल-ताशाचे वादन करत महाराष्ट्राची संस्कृती जोपासणाऱ्या श्रीराम पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पुण्यातील श्रीराम पथकाला वादनाची संधी मिळाली आहे.
श्रीराम पथकाला मिळालेल्या या संधीचा आनंद पुणेकरांबरोबर साजरा करण्यासाठी रविवारी (दि. 14) वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विलास शिगवण, नचिकेत फडके, देवेंद्र आठवले, ओंकार टिळेकर आणि अश्विन देवळणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या पथकाने आजवर अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग घेत पुण्यातील तरुणाईला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या 22 जानेवारी 2023 ला अयोध्या येथे श्री रामलल्लाची पुन्हा एकदा स्थापना होत असून हा ऐतिहासिक क्षण आपण सगळेच साजरा करणार आहोत.
या ‘न भूतो न भविष्यति’ अशा सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचे भाग्य श्रीराम पथकाला लाभले आहे. श्री रामजन्मभूमी न्यासाकडून श्रीराम पथकाला अयोध्या येथे ढोल-ताशा वादन करण्याचे आमंत्रण मिळाले असून महाराष्ट्राच्या, पुण्याच्या संस्कृतीचे अयोध्येत प्रदर्शन करून श्रीराम पथक ढोलताशा वादनाने रामलल्लाच्या चरणी आपली सेवा अर्पण करणार आहे.
याच बरोबर पथकाला काशी विश्वेश्वर येथील मंदिराच्या परिसरातही वादन करण्याची संधी देण्यात आली आहे.
श्रीराम पथकाला मिळालेल्या या संधीचा आनंद पुणेकरांसोबत साजरा करण्यासाठी रविवार, 14 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता पथकाने जाहीर वाद्यपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होणाऱ्या कार्यक्रमात प. पू. शंकराचार्य विद्यानृसिंहभारती (स्वामी संकेश्वर पीठ) यांच्या हस्ते वाद्यपूजन करण्यात येईल. स्वामी महंत 108 श्री. जनेश्वरानंद गिरीजी महाराज हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील. तसेच पुणे शहर आयुक्त, पोलिस आयुक्त, शहरातील सर्व आमदार, नेते मंडळी, गणेश मंडळे, शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
तसेच पुणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने या सोहळ्याला आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन पथकातर्फे करण्यात आले आहे.
श्रीराम पथकाविषयी थोडेसे
श्रीराम पथकातर्फे गेली अनेक वर्षे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान त्याचबरोबर विविध विषयांवर व्याख्यानमाला इत्यादी उपक्रम होत असतात.
कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी पथकाने जनकल्याण समितीला भरीव मदत केली आहे. अगदी अलीकडच्या करोना कालावधीमध्येसुद्धा पथकाने लसीकरण मोहीम, फूड पॅकेट व शिधा वाटप, पोलिस बांधवांना सॅनिटायझर व मास्क वाटप, विविध कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्यक्ष रुग्णशुश्रूषा अशा अनेक स्वरूपात आपले सामाजिक कर्तव्य जपण्याचा प्रयत्न केला आहे.
श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट करिता
राहुल नेमिचंद बोरा 9370748151
नचिकेत उमेश फडके 9881732144
जाहिरात