गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आता वेध ‘भालबा केळकर’ अन् राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे !!
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेनिमित्त तरुणाईचा जोश अनुभवल्यानंतर आता शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे कलागुण अनुभवायला मिळणार आहेत ते भालबा केळकर नाटिका आणि राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने.
स्पर्धेचे लॉटस् काढताना महाष्ट्रीय कलोपासकच्या अश्विनी वाघ, ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई, मंगेश शिंदे.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे लॉटस् आज (दि. 4) इंदिरा मोरेश्वर सभागृह येथे काढण्यात आले. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 31वे तर राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 11 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धा 15 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे.
भालबा केळकर स्पर्धेची सुरुवात आर्यन वर्ल्ड स्कूल, मानाजीनगरच्या ‘एका रेनबोची गोष्ट’ या नाटिकेने तर राजा नातू करंडक स्पर्धेची सुरुवात सिल्व्हर क्रेस्ट हायस्कूल, सिंहगड रोडच्या ‘रंगांध’ या एकांकिकेने होणार आहे.
स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होणार आहेत. भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 11 ते 13 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता तर दि. 14 रोजी दुपारी 1 आणि सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा दि. 15 ते दि. 17 आणि दि. 19 व दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता, दि. 21 रोजी दुपारी 1 आणि सायंकाळी 5 वाजता, दि. 23 रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.
भालबा केळकर नाटिका स्पर्धेत 29 संघांचा तर राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत 25 संघांचा सहभाग आहे. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. पारितोषिक वितरण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते होणार आहे. राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 28 जानेवारी रोजी होणार आहे. पुरस्कार वितरण ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
भालबा केळकर नाटिका स्पर्धा आणि राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांमधील शिक्षकांसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय तसेच तांत्रिक बाजूंसंदर्भात कार्यशाळा आयोजित केली जाते. कार्यशाळेचा शिक्षक उत्साहाने सहभागी होत असतात. लेखनासाठी शिक्षकवर्ग सकारात्मक असल्याचे दिसून येते. भालबा केळकर नाटिका स्पर्धा आणि राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांमधील जवळपास 50 टक्के शिक्षकांनी स्पर्धेसाठी नाट्य संहिता स्वत: नव्याने लिहिल्या आहेत, अशी माहिती मंगेश शिंदे यांनी दिली.
जाहिरात