गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत स. प. महाविद्यालयाच्या ‘कृष्णपक्ष’ची बाजी !
कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेजची ‘जंगल जंगल बटा चला है’ ठरली सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका !!
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत स. प. महाविद्यालयाच्या (पुणे) ‘कृष्णपक्ष’ एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका शहाजी लॉ कॉलेजची (कोल्हापूर) ‘जंगल जंगल बटा चला है’ ही ठरली.
संघास चार हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीप्रत्र देण्यात आले. आव्वाज कुणाचा..?, अंबाबाईच्या नावाने चांगलभलं, आले रे आले एस.पी. आले, जगात भारी कोल्हापुरी अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी नाट्यगृह दणाणून सोडले.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. 27 ते दि. 29 डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण 19 संघांचे सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 29) आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत सांघिक प्रथम प्रमांकाचे पारितोषिक पटकाविणारा स. प. महाविद्यालय, पुणेचा संघ. समवेत सूर्यकांत कुलकर्णी, अनंत निघोजकर, ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई, रवींद्र खरे, प्रदीप वैद्य, दिलीप जोगळेकर.
पारितोषिक वितरण फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेचे प्रमुख सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई तसेच परिक्षक ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे, प्रदीप वैद्य, दिलीप जोगळेकर व्यासपीठावर होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्रीय कलोपासकने विभागिय स्तरावर स्पर्धा सुरू करून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना रंगमंच विनाखर्च उपलब्ध करून दिला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत महाविद्यालयीन जीवन समरसून, समृद्धपणे जगा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. रंगमंचावरील वावर भविष्यातील वाटचालीसाठी सुद्धा उपयुक्त ठरतो, मनातील न्यूनगंड दूर सारला जातो. कल्पनाशक्तीला वाव मिळतो, असेही ते म्हणाले.
प्रदीप वैद्य म्हणाले, नाटक ही गोष्ट दिव्याच्या ज्योतीसारखी आहे. भव्य-दिव्यतेच्या मागे गेल्यास नाटकातील सहजता विसरली जाते. छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींना न्याय द्यायचे राहून जाते. नाटक ही साधी गोष्ट आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाला गोष्ट सांगणे आहे. नाटक हे नटांमार्फत वहन होत असते.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे पारितोषिक स्वीकाणारा शहाजी लॉ कॉलेजचा (कोल्हापूर) संघ. समवेत सूर्यकांत कुलकर्णी, अनंत निघोजकर, ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई, रवींद्र खरे, प्रदीप वैद्य, दिलीप जोगळेकर.
तांत्रिक बाबींमध्ये न अडकता संहिता, दिग्दर्शन, अभिनय या गोष्टींकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. नाटक म्हणजे चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकण्याची पायरी आहे असे समजू नये.नाटकाला स्वत:चे अस्तित्व, व्यक्तिमत्त्व आणि ताकद असते असे सांगून रवींद्र खरे म्हणाले, तंत्राच्या आहारी जाऊन हे अस्तित्व विसरता कामा नये. संहिता, संकल्पना ही माध्यमांमधील वृत्तांवर आधारित असू नये.
नाटकामध्ये प्रत्येक पात्राला स्व-भाव असतो. अट्टाहासाने नाटक जमत नाही तर संहितेच्या गाभ्यात नाटक गवसते. हशा, टाळ्या मिळविण्यासाठी नाटक केल्यास त्याचे यश क्षणभंगूर ठरते. कलाकाराच्या अस्तित्वाची समिधा दिल्यानंतरच पात्राच्या भूमिकेत शिरता येते. नाटक ही कला भिन्न प्रकृतीच्या व्यक्तिंचे एका वेळी, एकत्रितपणे समाधान करू शकते.
मान्यवरांचा सत्कार अनंत निघोजकर यांनी केला. पारितोषिकांची घोषणा आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
सांघिक प्रथम : कृष्णपक्ष (स. प. महाविद्यालय, पुणे).
सांघिक द्वितीय : असणं नसणं (देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सांघिक तृतीय : निर्झर (महावीर कॉलेज, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका : जंगल जंगल बटा चला है (शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर)
अभिनय नैपुण्य अभिनेता : (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने) : गंधार जोग (निळा, जंगल जंगल बटा चला है, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर).
अभिनय नैपुण्य अभिनेत्री : (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने) : शिरीन बर्वे (वृंदा, कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय, पुणे)
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : गंधार जोग (जंगल जंगल बटा चला है, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर).
सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) : भारत प्रभुखोत (निर्झर, निर्झर, महावीर कॉलेज, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) : पियुष जामदार (अनंता, असणं नसणं, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
अभिनय नैपुण्य उत्तेजनार्थ (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) : संपदा भालेराव (आजी, पिक्सल्स, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे), आर्या वानखडे (यामिनी, साकव, प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च), राज पाटील (अनिरुद्ध जोशी, फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, पुणे), प्रथमेश बाटे (पट्या, बोबड्या, फिनोलेक्स कॉलेज, रत्नागिरी), शांभवी सुतार (सोनी, बोबड्या, फिनोलेक्स कॉलेज, रत्नागिरी), अक्षर ठाकरे (तो, तो पाऊस आणि टाफेटा, प्रताप महाविद्यालय, अमळनेर), क्रांती कांबळे (विद्या, हॅपी फादर्स डे, डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण), मुकल ढेकळे (फहीम चाचा, रवायत-ए-विरासत, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे), आदित्य चव्हाण (दिग्या, पाहिजे म्हणजे पाहिजे, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर), आकाश सकपाळ (बाबा, वन पिस, श्री स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड).
जाहिरात