गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुरभी थिएटरद्वारे पुण्यात नाट्यप्रयोग सादर करण्याचा मानस !!
आंध्रप्रदेशातील तेलगू रंगभूमीवरील रंगकर्मींचा पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद !
पुणे : मराठी संगीत रंगभूमी आजही समृद्ध आहे. मराठी संगीत रंगभूमीची बीजे घेऊन आमचे पूर्वज महाराष्ट्रातून दक्षिणेकडे स्थलांतरित झाले. सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून वनारसे कुटुंबिय सुरभी थिएटरच्या माध्यमातून नाट्य चळवळीत आहेत. ट्रिक सिन्स आणि स्पेशल इफेक्टस् हे सुरभी थिएटरचे वैशिष्ट्य आहे. हे तंत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
सुरभी थिएटर आणि मराठी रंगभूमीच्या परंपरेचा संगम साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यात सुरभी थिएटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात विशेष करून पुण्यात नाट्यप्रयोग करण्याचा मानस असल्याचा विचार सुरभी थिएटर परिवारातील रंगकर्मी जयचंद्र वर्मा, अजयकुमार वनारसे यांनी आज व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत उपस्थित प्रदीप पाटसकर, अजयकुमार वनारसे, जयचंद्र वर्मा, डॉ. व्ही. व्ही. एल. श्रीनिवास, ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. सुहास जोशी, अनंत निघोजकर.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंकड स्पर्धेची महाअंतिम फेरी पाहण्यासाठी वर्मा, वनारसे आणि नाट्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. व्ही. व्ही. एल. श्रीनिवास आंध्रप्रदेशातून पुण्यात आले आहेत. या निमित्ताने त्यांनी आज पुण्यातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. सुहास जोशी, प्रदीप पाटसकर या वेळी उपस्थित होते.
सुरभी थिएटर आणि महाराष्ट्रीय कलोपासक यांचा अनुबंध कशा पद्धतीने जुळला या विषयी सांगताना ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले, मूळचे आंध्र प्रदेशातील पण गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ पुण्यात (निगडी) वास्तव्यास असलेले ए. एल. मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून पुरुषोत्तम करंकड स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत. त्यांच्यामुळे डॉ. श्रीनिवास यांचा परिचय झाला.
प्राथमिक फेरीप्रमाणेच महाअंतिम फेरी पाहण्यासाठी डॉ. श्रीनिवास पुण्यात आले आहेत. डॉ. श्रीनिवास आणि मूर्ती यांच्याशी चर्चा करीत असताना वनारसे कुटुंबियांच्या सुरभी थिएटरची माहिती मिळाली. मराठी रंगभूमी आणि सुरभी थिएटर यांचे मूळ एकच असल्याने नाट्यसंस्कृतीविषयी देवाणघेवाण व्हावी यादृष्टीने चर्चा झाली. त्या अनुषंगाने सुरभी थिएटरचे रंगकर्मी महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित स्पर्धा पाहण्यासाठी पहिल्यांदाच पुण्यात आले.
डॉ. श्रीनिवास म्हणाले, एक कुटुंब एक थिएटर अशी सुरभी थिएटरची ओळख आहे. सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरभी रंगमंचावर वनारसे कुटुंबिय कार्यरत आहेत. यातील प्रत्येक कलावंत हा एकाच कुटंबातील असून या प्रत्येकाने त्याचे आयुष्य रंगमंचासाठी समर्पित केले आहे. यात वयाची अथवा निवृत्तीची अट नाही. सुरभी थिएटर हे रंगमंचाला समर्पित असे छोटेसे विश्वच आहे.
जयचंद्र वर्मा म्हणाले, सध्या नाट्यव्यवसाय सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तरीही सुरभी थिएटर पारंपरिक कला जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. रंगभूमीविषयीचे प्रेम आणि परंपरा जतन करीत प्रवाहित ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वनारसे कुटुंबातील सातवी पिढी सुरभी थिएटरमध्ये सध्या कार्यरत आहे.
महाराष्ट्रात आजही नाटकाविषयी कलावंतांसह रसिकांमध्ये ओढ असल्याचे दिसून येते. विविध महोत्सवांमध्ये महाराष्ट्रातील संगीत नाटके पाहण्याचा योग आला त्यातून हे प्रकर्षाने जाणवले. महाराष्ट्रातील संगीत रगंभूमी आणि सुरभी थिएटर यांचे बीज एकच असल्याने महाराष्ट्रात आमची कला सादर व्हावी अशी आमची इच्छा आहे. सुरुवातीच्या काळात सुरभी थिएटरचे ट्रिक सिन्स आणि स्पेशल इफेक्टस् कशापद्धतीने केले जातात हे समजू दिले जात नव्हते. पण ही प्रतिभा आणि परंपरा पुढील पिढीमध्ये प्रवाहित होण्यासाठी महाराष्ट्रातील रंगकर्मींसाठी कार्यशाळा घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले, सुरभी थिएटर आणि पुण्यातील रंगकर्मींमध्ये चर्चा घडवून आणली आहे. येत्या वर्षभरात पुणेकरांना सुरभी थिएटरच्या सहकार्याने वेगळा काही प्रयोग बघता येऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न असतील.
पुरुषोत्तक करंडक स्पर्धेविषयी कौतुक
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेविषयी अनेक वर्षांपासून ऐकून होतो. पहिल्यांदाच ही स्पर्धा पाहण्याचा योग आला. राज्यस्तरावर गेल्या 56 वर्षांपासून स्पर्धा भरविली जात आहे, याचे कौतुक असल्याचे जयचंद्र वर्मा म्हणाले.
जाहिरात