गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुरभी थिएटरच्या कलावंतांची कला महाराष्ट्रात आणण्याची ग्वाही !
महाराष्ट्रीय कलोपासकच्या मंचावर तेलगू-मराठी रंगकर्मींचा रंगला संवाद :!
पुणे : मूळचे महाराष्ट्रीय पण जवळपास सहा पिढ्यांपासून आंध्र प्रदेशात स्थायिक झालेल्या नाट्य कलावंतांना रंगभूमीच्या माध्यमातून महाराष्ट्राशी जोडण्यासाठी पुण्यातील नाट्य कलावंतांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. संस्थात्मक स्तरावर या दृष्टीने प्रयत्न करू अशी ग्वाहीही पुण्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ रंगकर्मींनी आज दिली.
महाराष्ट्रातील संगीत नाटकांची बीजे आंध्र प्रदेशात सुरभी थिएटरच्या माध्यमातून रुजविणाऱ्या वनारसे कुटुंबातील कलावंत तब्बल 120 वर्षांनंतर पुण्यात आले आहेत. वनारसे कुटुंबातील कलावंतांचे पुण्यात येण्याचे निमित्त ठरले आहे ते महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंकड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे. स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिका हे सुरभी थिएटरचे कलावंत मोठ्या उत्कंठतेने पाहात आहेत.
वनारसे कुटुंबियातील कलावंत अजयकुमार वनारसे, जयचंद्र वर्मा तसेच नाट्यशास्त्राचे अभ्यासक व्ही. व्ही. एल. श्रीनिवास ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून पुण्यात आले आहे.महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांच्या पुढाकारातून पुण्यातील रंगकर्मींच्या संवादात्मक कार्यक्रमाचा योग जुळून आला.
यात महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, नाट्यशास्त्राचे अभ्यासक, प्रसिद्ध दिग्दर्शक प्रसाद वनारसे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वैद्य, शुभांगी दामले, दीप्ती भोगले, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, भरत नाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे, प्रसिद्ध ऑर्गन वादक राजीव परांजपे, निनाद जाधव, मिलिंद सबनीस, बंडा जोगळेकर, डॉ. सुहास जोशी, अमृता पटवर्धन, प्रदीप पाटसकर, अश्विनी वाघ आदी उपस्थित होते.
एक कुटुंब एक थिएटर अशी सुरभी थिएटरची ओळख आहे. सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरभी रंगमंचावर वनारसे कुटुंबिय कार्यरत आहेत. यातील प्रत्येक कलावंत हा एकाच कुटंबातील असून या प्रत्येकाने त्यांचे आयुष्य रंगमंचासाठी समर्पित केले आहे. यात वयाची अथवा निवृत्तीची अट नाही. सुरभी थिएटर हे रंगमंचाला समर्पित असे छोटेसे विश्वच आहे.
सुरुवातीस व्ही. व्ही. एल. श्रीनिवास यांनी सुरभी थिएटरच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या वनारसे कुटुंबातील कलांवंतांच्या तसेच सुरभी थिएटरच्या कार्याची ओळख करून दिली. वनारसे कुटुंबिय मूळचे महाराष्ट्रीयन असून 120 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशात स्थायिक झाले आहेत. वनारसे कुटुंबिय आंध्र प्रदेशात गेल्यानंतर महाराष्ट्रातील संगीत रंगभूमीची परंपरा जपत तेथे त्यांनी तेलगू भाषेत संगीत नाटकांचे प्रयोग सादर करण्यास सुरुवात केली.
जयचंद्र वर्मा म्हणाले, आमची कला महाराष्ट्रातील रसिकांसमोर सादर करण्याची इच्छा आहे. तेलगू भाषेतील नाट्यकृती पुण्यात सादर करण्यासाठी मराठी रंगभूमीवरील कलावंत मंडळी आम्हाला बोलवत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. मराठी संगीत रंगभूमीला जशी परंपरा आहे त्याच प्रमाणे सुरभी थिएटरला संगीत नाटकांची परंपरा आहे. सुरभी रंगभूमीवर सादर केल्या जाणाऱ्या नाट्यकृती या प्रामुख्याने पौराणिक विषयांवरील असतात.
तसेच विषयानुरूप त्यात नाट्यपदेही लिहिली जातात व साथीदारांसह सादर केली जातात. सुरभी रंगभूमी ही लोककलांशी जोडली गेलेली आहे. रंगमंचावरील ट्रिक्स आणि स्पेशल इफेक्टस् हे सुरभी थिएटरचे वेगळेपण आहे. सुरभी थिएटरची कला संपूर्ण कुटुंबानेच जपली आहे, जोपासली आहे आणि प्रवाहितही ठेवली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सुरभी थिएटरच्या कलावंतांना पुण्यात सादरीकरण करण्यासाठी वैयक्तिक तसेच संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करू अशी ग्वाही या वेळी पुण्यातील रंगकर्मींनी सुरभी थिएटरच्या कलावंतांना दिली.
जाहिरात