गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘चोखोबा ते तुकोबा’ समतावारी एक जानेवारीपासून
मंगळवेढ्यात शुभारंभ तर देहूगाव येथे समारोप .!
संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधुभाव या मूल्यांचा होणार जागर !
पुणे : संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चोखोबा ते तुकोबा’ या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा प्रारंभ सोमवार, दि. 1 जानेवारी 2024 रोजी श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे होणार असून समारोप शुक्रवार, दि. 12 जानेवारी 2024 रोजी जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जन्मभूमी असलेल्या देहूगाव येथे होणार आहे.
संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधुभाव या मूल्यांचा जागर हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
प्रा. अलका सपकाळ
‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची 2023’चे यंदाचे 6वे वर्ष आहे. ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, नाईचाकूर, माकणी, तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम-पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, पैठण, संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे जाणार आहे.
वारी 8 जिल्ह्यातून 1350 किलोमीटर प्रवास करणार आहे.संतांनी सांगितलेल्या समता, बंधुता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, वाड्या-वस्ती, गाव, शहर या ठिकाणी जाऊन वारी दरम्यान प्रबोधन करण्यात येणार आहे.
माणसा माणसातील वाढत चाललेली दरी कमी होऊन समाजात बंधूभाव वाढीस लागावा, समाजातील जातीय-धार्मिक विद्वेषी दरी कमी होऊन आपापसात बंधूभाव वाढावा यासाठी तसेच समता, मानवता व बंधूभावाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यत पोहचवण्यासाठी समता वारीचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असल्याचे वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
एकसंघ समाज हे राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे. जात, पंथ, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्वजण भारतीय एक आहोत हा विचार घेऊन सामाजिक एकतेसाठी चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेचीचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संयोजन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. अलका सपकाळ
समता वारीच्या मध्यवर्ती संयोजन समितीच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रा. अलका सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. सपकाळ या सजग समाजभान असलेल्या साहित्यिक कवयित्री असून कृतीशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
सपकाळ यांनी आपल्या साहित्याद्वारे शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, वंचित महिलांच्या वेदनांना शब्दरूप दिले आहे.बंधूता अन समन्वयवादी विचारांच्या त्या पुरस्कर्त्या आहेत. त्यांना संत साहित्यातही विशेष रुची आहे.
जाहिरात