गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गानवर्धनतर्फे पं. बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ रंगली ‘स्वरआदरांजली’ मैफल .!
पंडित अरुण कशाळकर, डॉ. संध्या काथवटे यांचे बहारदार गायन !
संजना कौशिक आणि स्वरा जोशी यांना पं. बबनराव हळदणकर शिष्यवृत्ती प्रदान
पुणे : आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गुरू पंडित बबनराव हळदणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘स्वरआदरांजली’ या विशेष मैफलीचे गानवर्धन संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ गायक पं. अरुण कशाळकर आणि गायिका विदुषी डॉ. संध्या काथवटे यांच्या रंगतदार सादरीकरणाने ही स्वरमैफल स्मरणीय ठरली.
याप्रसंगी पं. हळदणकर यांच्या स्मृत्यर्थ हळदणकर कुटुंबियांतर्फे सुरू केलेली शिष्यवृत्ती गायिका संजना कौशिक आणि स्वरा जोशी यांना प्रदान करण्यात आली. प्रत्येकी 10 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.
नारायण पेठेतील केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात झालेल्या या मैफलीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची संकल्पना पं. हळदणकर यांचे सुपुत्र गौतम हळदणकर यांची होती. याप्रसंगी गौतम हळदणकर, पं. हळदणकर यांच्या पत्नी उषाताई हळदणकर, प्रसिद्ध गायिका पौर्णिमा धुमाळे, शुभदा पराडकर, अंजली मालकर, पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
गानवर्धन आयोजित स्वरआदरांजली कार्यक्रमात सहभागी पंडित अरुण कशाळकर व सहकारी.
यानिमित्ताने पं. हळदणकर यांच्या आठवणींना शिष्यांनी उजाळा दिला.गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. ‘गानवर्धन संस्था यंदाचे वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे करीत आहे.
या निमित्ताने संस्थेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.उभरती कलाकार स्वरा जोशी हिने मुलतानी रागातील रचना पेश केल्या. त्यानंतर पं. हळदणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉ. संध्या काथवटे यांनी सायंकालीन राग मारवा मध्ये 3 रचना सादर केल्या. ठुमरी गायनावरही प्रभुत्व असलेल्या डॉ. संध्या यांनी पिलू रागातील ठुमरीने आपल्या गायनाची सांगता केली. ‘पं. हळदणकर हे प्रतिभावंत गायक तर होतेच, पण उत्तम गुरू, वाग्गेयकार, लेखक, आस्वादक होते’, असे त्या म्हणाल्या. त्यांना प्रवीण कासलीकर (संवादिनी) आणि संजय देशपांडे (तबला) तसेच श्रेयसी आपटे व श्रेया कुलकर्णी यांनी तानपुरा व स्वरसाथ केली.
गानवर्धन आयोजित स्वरआदरांजली कार्यक्रमात सहभागी डॉ. संध्या काथवटे व सहकारी.
पं. अरुण कशाळकर यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा विशेष अभ्यास केला आहे. प्रस्तुत मैफलीत त्यांनी राग दरबारी कानडामध्ये नोमतोम करून ‘हजरत तुर्कमान’ तसेच ‘मोरे आंगन आयो’ ही स्वरचित बंदिश सादर केली. त्यानंतर पटमंजिरी रागातील ‘भई बैरन मोरी’ ही स्वरचित बंदिश पेश केली. त्यांना विशाल मोघे, रवींद्र परचुरे आणि मुकुल कुलकर्णी यांनी तानपुरा व स्वरसाथ केली. पं. बबनराव हळदणकर यांच्या स्वरातील भैरवीमधील ध्वनिमुद्रिकेने या मैफलीची सांगता झाली.
गानवर्धन संस्थेच्या विश्वस्त डॉ. विद्या गोखले यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या उपाध्यक्ष नीलिमा राडकर, कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे, तसेच रवींद्र दुर्वे यांनी स्वागत केले. कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला होता.
जाहिरात