गोल्डन आय न्यूज नेटवर्क
लेखनातून हवा कृतीशील वस्तुपाठ : हेरंब कुलकर्णी
उद्धव कानडे यांच्या ‘माणूसपणाची सनद’, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या ‘बंधुतेचं झाड’ ललित ग्रंथाचे प्रकाशन !
पुणे : ‘संवेदनशील माणूस हाच मानवतावादी असू शकतो. सगळ्यांचे दु:ख आपल्याला घ्यावे लागेल, ती आर्तता आपल्यात येईल त्यानंतरच बंधुतेचं जे झाड आहे त्याला पालवी फुटेल. तेव्हाच माणुसकीची सनद तयार होईल. लेखनातून केवळ वाचनव्यवहार नव्हे तर कृतीशील वस्तुपाठ घालून देता आला पाहिजे,’ असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी केलं.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांच्या ‘माणूसपणाची सनद’ आणि प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या ‘बंधुतेचं झाड’ या ललित ग्रंथांचे प्रकाशन कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते झाले.
माणूसपणाची सनद’ आणि ‘बंधुतेचं झाड’ या ललित ग्रंथांच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) संतोष शेणई, प्रा. जे. पी. देसाई, डॉ. संभाजी मलघे, हेरंब कुलकर्णी, डॉ. सुनीलकुमार लवटे, उद्धव कानडे, सचिन ईटकर, सुनील महाजन.
त्यावेळी कुलकर्णी बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता.संवाद पुणे आणि पद्मगंधा प्रकाशन आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विनोद शहा होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, साहित्यिक प्रा. जे. पी. देसाई यांच्यासह संवादचे अध्यक्ष सुनील महाजन, मसापचे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे उपस्थित होते.
लेखक, कवींना प्रत्यक्ष सक्रीय करणे हे आजच्या काळातले आव्हान आहे. संवेदना हरवून आज आपण रडलो नाही तर थेट गाडले जाऊ तेही, साधेसुधे नव्हे तर लोकशाहीचा बॅन्ड लावून अशी भयावह शक्यताही हेरंब कुलकर्णी यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.
त्याचवेळी माणूसकीची जतनसाक्षरता व्हायला हवी अशी अपेक्षा डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली. विजय तेंडुलकरांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले, आज भरल्या घरात अनाथ मुले वाढताहेत हे वर्तमान संस्कृतीचे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. येणाऱ्या पिढीला माणूसपणाचा, मनुष्यत्वाचा स्पर्ष व्हायलाच हवा. यादृष्टीने सुसंस्कृत समाजाच्या सेतु बांधणीत या दोन्ही पुस्तकांचे योगदान महत्त्वाचे ठरावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रा. जे. पी. देसाई, शिरीष चिटणीस यांनी भाषणातून दोन्ही पुस्तकांची संकल्पना आणि मांडणीची कल्पना दिली. दोन्ही पुस्तकांच्या जडणघडणीत सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी केले. आभार प्रदर्शन कवी उद्धव कानडे यांनी केले.
कार्यक्रमाला पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे, प्रकाशक संतोष शेणई, राजेंद्र पवार, नरेंद्र आढाव, डॉ. तुकाराम रोंगटे, प्रभाकर वाघोले, मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात