गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गानवर्धनतर्फे पं. बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ ‘स्वरआदरांजली’ मैफलीचे शनिवारी आयोजन !
पंडित अरुण कशाळकर, डॉ. संध्या काथवटे यांचे गायन !
पुणे : शास्त्रीय संगीत क्षेत्रात गेल्या 44 वर्षांपासून सातत्याने वैविध्यपूर्ण कार्यक्रम करीत असलेल्या गानवर्धन संस्थेतर्फे शनिवार, दि. 23 डिसेंबर रोजी आग्रा घराण्याचे थोर गायक पंडित बबनराव हळदणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘स्वरआदरांजली’ या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मैफल सायंकाळी 5:30 वाजता नारायण पेठेतील केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात आयोजित करण्यात आली असून ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीनही घराण्यांच्या गायकीचा मिलाफ असलेले पंडित अरुण कशाळकर आणि ख्याल तसेच ठुमरी गायनात प्रभुत्व असलेल्या डॉ. संध्या काथवटे यांचे या मैफलीत गायन होणार आहे, अशी माहिती गाधवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रमाची संकल्पना गौतम हळदणकर यांची असून कलाकारांना प्रवीण कासलीकर (संवादिनी) आणि संजय देशपांडे (तबला) साथसंगत करणार आहेत.
गानवर्धन संस्था यंदाचे वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे करीत आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या वर्षी मुक्तसंगीत चर्चासत्र पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. भातखंडे, पं. इचलकरंदीकर यांना अर्पण करण्यात आले. पं. रामकृष्णबुवा वझे यांच्या जीवनकार्यावर विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
तर पं. राम मराठे यांच्या सांगीतिक कार्यावर आधारित स्वरभूषण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेतीलच पं. बबनराव हळदणकर यांच्या स्मरणार्थ शनिवारी आयोजित करण्यात आलेली मैफल आहे.
पं. अरुण कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा तसेच जुन्या गायकांच्या गायकीचा अभ्यास केला आहे. आग्रा घराण्याच्या गायकीवर त्यांचा विशेष भर असतो. पं. कशाळकर यांनी रसदान या टोपणनावाने काही बंदिशी रचल्या आहेत.
डॉ. संध्या काथवटे यांचे ख्याल व ठुमरी या दोन्ही गायन शैलींवर प्रभुत्व आहे. इंदूरच्या संगीतप्रेमी कुटुंबात वाढलेल्या डॉ. काथवटे यांना डॉ. शशिकला तांबे, पं. वि. रा. आठवले, पं. बबनराव हळदणकर हे गुरू म्हणून लाभले. त्यांनी संगीत क्षेत्रात डॉक्टरेट मिळविलेली असून त्या अनेक विश्व विद्यालयांमध्ये मानद गुरू म्हणून कार्यरत आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात