गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आंध्र प्रदेशातील महाराष्ट्रीयन वनारसे साधणार पुणेकर कलावंतांशी संवाद !!
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीनिमित्त जळून आला आहे योग !
पुणे : महाराष्ट्रातील संगीत नाटकांची बीजे आंध्र प्रदेशात सुरभी थिएटरच्या माध्यमातून रुजविणाऱ्या वनारसे कुटुंबातील कलावंत तब्बल 120 वर्षांनंतर पुण्यात येत असून संगीत नाटकासह हौशी, व्यावसायिक रंगभूमीवरील कलावंत, दिग्दर्शकांशी संवाद साधणार आहेत.
हा योग जुळून येत आहे तो महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीनिमित्ताने!
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आंध्र प्रदेशातील व्ही. व्ही. एल. श्रीनिवास आणि एस. पी. आदिनारायण यांनी हजेरी लावली होती. मूळचे आंध्र प्रदेशातील पण गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ पुण्यात (निगडी) वास्तव्यास असलेल्या ए. एल. मूर्ती यांच्यामुळे श्रीनिवास आणि आदिनारायण पुरुषोत्तम स्पर्धेची प्रार्थमिक फेरी पाहण्यासाठी पुण्यात आले होते.
त्याच वेळी त्यांनी महाअंतिम फेरीला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या प्रमाणे ते येतही आहेत. त्यांच्या समवेत येत आहेत वनारसे कुटुंबियातील कलावंत अजयकुमार वनारसे.
वनारसे कुटुंबिय मूळचे महाराष्ट्रीयन. अलिबाग येथून पुणे आणि पुण्यातून थेट आंध्र प्रदेश. वनारसे कुटुंबिय 120 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशात गेले ते महाराष्ट्रातील संगीत नाटकाची बीजे घेऊन.
तेथे त्यांनी सुरभी थिएटरची मुहूर्तमेढ रोवली आणि संगीत नाटकांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्या काळी त्यांना मदत झाली ती आंध्र प्रदेशात बाहुल्यांचे खेळ करणाऱ्या कलावंतांची.
व्ही. व्ही. एल. श्रीनिवास, एस. पी. आदिनारायण आणि अजयकुमार वनारसे हे स्पर्धेदरम्यान महाराष्ट्रातील संगीत नाटक, प्रायोगिक रंगभूमी या संदर्भात पुण्यातील रंगकर्मी प्रसाद वनारसे, शुभांगी दामले, दीप्ती भोगले, डॉ. प्रवीण भोळे, रवींद्र खरे, राजीव परांजपे यांच्याशी संवाद साधणार आहेत.
हा संवादात्मक कार्यक्रम दि. 27 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता —येथे आयोजित करण्यात आला आहे. या चर्चेसाठी महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी पुढाकार घेतला आहे.
महाअंतिम फेरीचे लॉटस् निघणार मंगळवारी
स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे लॉटस् मंगळवार, दि. 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता फडके हॉल येथे काढण्यात येणार असून महाअंतिम फेरी दि. 27 ते दि. 29 डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.
पाच सत्रात 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
जाहिरात