गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भारतमातेच्या चित्रांद्वारे एकात्मतेचा संदेश : खासदार मेधा कुलकर्णी
ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवाची सुरुवात
वन्दे मातरम् चा इतिहास आणि भारतमातेची विविध रूपे दर्शविणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे : भारतीयांच्या दृष्टीने देश म्हणजे केवळ भौगोलिक भाग नाही तर ती मातृभूमी आहे. यातूनच देशाकडे राष्ट्र आणि माता या भूमिकांमधून पाहिले जाते. आजच्या युवा पिढीनेही आपण देशाचे देणे लागतो या भावनेतून मातृभूमीकडे बघणे आवश्यक आहे.
वन्दे मातरम्चा इतिहास मांडणारे तसेच भारतमातेच्या चित्रांद्वारे मातृभूमीची विविध रूपे दर्शविणारे हे प्रदर्शन पाहताना एकात्मतेचा संदेश मिळत असल्याने देशवासियांनी भावंडांसारखे एकत्र राहिले पाहिजे, ही भावना मातृभूमी जागृत करत असल्याचे जाणवते, असे प्रतिपादन खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
वन्दे मातरम् या राष्ट्रमंत्राच्या सार्ध शती (150) जयंती वर्षानिमित्त तसेच ऋषी बंकिमचंद्र यांच्या 131व्या स्मृतीदिनानिमित्त ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवानिमित्त वन्दे मातरम्चा इतिहास मांडणाऱ्या तसेच गेल्या सव्वाशे वर्षात नामवंत भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या भारतमातेच्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन आज (दि. 8) खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
दि. 12 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. प्रदर्शनाचे संयोजक मकरंद केळकर आणि वन्दे मारतम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर जोशी, अनिल उपळेकर यांची विशेष उपस्थिती होती.
प्रास्ताविकात प्रदर्शनाच्या आयोजनाविषयी माहिती सांगताना मिलिंद सबनीस म्हणाले, या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या भारतमातेच्या प्रत्येक चित्राला इतिहास आहे. हा इतिहास थोडक्यात मांडण्यात आला आहे.
भारतमातेची विविध रूपे या निमित्ताने पहायला मिळणार आहेत. रावबहादूर धुरंधर, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, अल्लाबक्ष, पंडित श्रीपाद दा. सातवळेकर, अवनीन्द्रनाथ ठाकूर, वासुदेव कामत, सुहास बहुळकर यांच्या मुद्रित चित्रांसह जि. भी. दीक्षित, अनिल उपळेकर, सचिन जोशी, गिरीश सहस्रबुद्धे, चंद्रशेखर जोशी यांची मूळ चित्रेही प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, भारतमाता पुन्हा एकदा सिंहासनावर आरूढ होऊन आपल्या लेकरांना सांभाळून घेत देशाला सुरक्षा, शांतता, स्थैर्य देईल असा विश्वास वाटतो. ऋषी बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारीत ‘आनंदमठ’ हे संगीत नाटक हिंदीत यावे, जेणे करून ते राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होईल.
सुरुवातीस ऋषी बंकिमचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. रेव्हरंड टिळक रचित ‘वन्दे त्वाम् भू देवीं’ या अपर्णा केळकर यांनी संगीत दिलेल्या गीताचे गायन स्वानंदी वाणी आणि साव्या कुलकर्णी यांनी केले
ऋषी बंकिमचंद्र यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या स्मृतीमहोत्सवाची सांगता शनिवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘आनंदमठ’ या संगीत नाटकाच्या प्रयोगाने होणार आहे. सूत्रसंचालन सुमित डोळे यांनी केले तर आभार मकरंद केळकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मास्टर कृष्णराव फुलंब्रिकर यांनी संगीतबद्ध केलेल्या संपूर्ण वन्दे मातरम्च्या सामूहिक गायनाने करण्यात आली.