गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वैद्य यांची कविता संवेदनशील मनाचा उद्गार : डॉ. संगीता बर्वे.
करम प्रतिष्ठानतर्फे वासंती वैद्य लिखित ‘आवर्त’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन !
पुणे : आजच्या स्त्रीची सोसण्यातूनही उमलून येणारी आणि एकतारीसारखी सतत झणत्कार करत राहणारी कविता वासंती वैद्य यांच्या संग्रहातून भेटते, असे प्रतिपादन साहित्य अकामदी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी रविवारी येथे केले.
करम प्रतिष्ठानतर्फे कवयित्री वासंती वैद्य यांच्या ‘आवर्त’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. 10) पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
काव्यसंग्रहाचे प्रकाशन रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, साहित्यसुहृद ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षीय मनोगत मांडताना डॉ. बर्वे बोलत होत्या. करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, कवयित्री प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते.
करम प्रतिष्ठान आयोजित ‘आवर्त’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) प्रज्ञा महाजन, ॲड. प्रमोद आडकर, वासंती वैद्य डॉ. संगीता बर्वे आणि भूषण कटककर
करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर प्रास्ताविकात म्हणाले, ‘समकालीन कवींना उत्तेजन देणे ही साहित्यक्षेत्राची मोठी जबाबदारी आहे. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा पुढे जात आहे हे प्रकर्षाने पुढे येणे आवश्यक आहे. ही भावना मनात बाळगून करम प्रतिष्ठान कार्यरत आहे’.
‘स्त्री शिक्षणाची सुरुवात झाल्यानंतर स्त्रिया अधिक संख्येने आणि मोठ्या प्रमाणात लिहू लागल्या, असे सांगून बर्वे म्हणाल्या,“आयुष्यात विविध प्रकारचे सुखदुःखाचे क्षण येतात, काही सोसावे लागते, वेदना होतात. संवेदनशील मन या साऱ्यांना कवितेतून वाट देते. ते अनुभवाचेच बोल असतात. वासंती वैद्य यांच्या कविताही या संवेदनशील मनाचा उद्गार आहेत. या कवितांमधून कवयित्रीचा वृत्त, छंदांचा अभ्यासही प्रकट झाला आहे”.
प्रमोद आडकर म्हणाले, “वैद्य यांच्या कवितांमध्ये विषय आणि आशयाचे वैविध्य आहे. या कविता वैचारिक पातळीवर चिंतनाला प्रवृत्त करणाऱ्या आहेत. कवयित्रीची शैली सुगम, सहज आहे”.
कवयित्री वासंती वैद्य म्हणाल्या,“आपली अभिव्यक्ती कवितासंग्रहाच्या रूपात रसिकांसमोर येणे, हा अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे.
माझे कुटुंबीय, करम प्रतिष्ठानचे सहकारी यांच्यामुळे हे क्षण प्रत्यक्षात आले, हे आवर्जून सांगायला हवे”.
कवयित्री प्रज्ञा महाजन, वर्षा कुलकर्णी यांनी याप्रसंगी वैद्य यांच्या कवितांचे अभिवाचन केले. मान्यवरांचा सत्कार भूषण कटककर, प्रज्ञा महाजन यांनी केला. वासंती वैद्य यांचा सत्कार डॉ. संगीता बर्वे यांनी केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. त्यामध्ये प्राजक्ता पटवर्धन, निरुपमा महाजन, चंचल काळे, स्मिता जोशी-जोहरे, डॉ. मंदार खरे, स्वाती यादव, उर्मिला वाणी, मानसी चिटणीस, सानिका दशसहस्र, चिन्मयी चिटणीस, मंजिरी आराध्ये, योगिनी जोशी, मुक्ता भुजबले यांचा सहभाग होता. वैजयंती आपटे आणि प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता भुजबले यांनी आभार मानले.
जाहिरात