गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रसिकांनी अनुभवला ‘गंधर्वकाळ’
मराठी रंगभूमी, पुणेतर्फे ‘गंधर्वसूरांची शिलेदारी’ !!
नाट्यसंगीत मैफलीस रसिकांची भरभरून दाद !
पुणे : संगीत विद्याहरण नाटकातील ‘सूर सुखकरी तू विमला’, संगीत द्रौपदीमधील ‘लाजविले वैऱ्याला’ ही नाट्यपदे तर संगीत स्वरसम्राज्ञीमधील ‘टुमदार कुणाची छान, नवती भरज्वान, पुसारे आली कुठून’ ही उडत्या चालीतील लावणी या आजच्या काळात सहसा ऐकायला न मिळणाऱ्या संगीत नाटकातील रचनांनी नाट्यसंगीत प्रेमींना भुरळ घातली.
मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. 6) आयोजित करण्यात आलेल्या ‘गंधर्वसूरांची शिलेदारी’ या विशेष मैफलीचा रसिकांनी आनंद घेतला. नाट्यसंगीतावर आधारित ही मैफल डॉ. संचेती ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आली होती.
आजचे आघाडीचे गायक अभिनेते निनाद जाधव, चिन्मय जागळेकर आणि गायक अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांनी सुरेल, सुमधुर नाट्यगीते सादर करून रसिकांसमोर गंधर्व काळ उभा केला. लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), अभिजित जायदे (तबला), निर्झरी चिंचाळकर (टाळ) यांनी समर्पक साथसंगत केली.
मराठी रंगभूमी, पुणे आयोजित ‘गंधर्वसूरांची शिलेदारी’ कार्यक्रमात वर्षा जोगळेकर, अभिजित जायदे, निनाद जाधव, अस्मिता चिंचाळकर, चिन्मय जोगळेकर, लीलाधर चक्रदेव.
ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा जोगळेकर यांनी गंधर्व भूषण जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार, किर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले यांच्यासह मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अविस्मरणीय वाटचालीविषयी किस्से सांगून कार्यक्रमात रंगत आणली.
‘गंधर्वसूरांची शिलेदारी’ या नाट्यसंगीत मैफलीची सुरुवात संगीत सौभद्रमधील ‘नमुनी इश चरणा’ या नांदीने झाली. संगीत स्वयंवरमधील ‘मम आत्मा गमला’, संगीत मानापमानमधील ‘चंद्रिका ही जणू’, संगीत सौभद्रमधील ‘प्रिये पहा’ तर संगीत कान्होपात्रामधील ‘पतित तू पावना’ अशी रसिकप्रिय पदेही सादर करण्यात आली. मैफलीची सांगता दीप्ती भोगले यांनी लिहिलेल्या आणि कीर्ती शिलेदार यांनी संगीतबद्ध-शब्दबद्ध केलेल्या संगीत स्वरविभ्रम नाटकातील ‘सप्तसूरांच्या विभ्रमाने विसरलो देहभान’ या भैरवीने करण्यात आली.
गंधर्व भूषण जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांनी सुरू केलेल्या मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून गंधर्व परंपरेची पताका हाती घेतली. शिलेदार कुटुंबियांतील पुढील पिढी देखील या परंपरेचे जतन करण्यासाठी अवितरपणे कार्यरत आहेत.
संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रात नाट्यसंगीत विषयक विविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे वर्षा जोगळेकर यांनी या प्रसंगी नमूद केले.
जाहिरात