गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ओडिसी, भरतानाट्यम् नृत्याविष्कार आणि अभ्यासपूर्ण विवेचन !
आयसीसीआर, ललित कला केंद्रातर्फे आयोजन !
पुणे : सौंदर्य आणि शक्तीचे परिपूर्ण मिश्रण असणाऱ्या दुर्गेची महती विशद करणारे, राधा आणि कृष्णाच्या भावपूर्ण नाते उलगडून दाखविणारे, मोक्ष नृत्य आणि शुद्ध नृत्याचे ओडिसी नृत्यशैलीतून घडलेले दर्शन तसेच भरतनाट्यम् नृत्याद्वारे सादर होणारे शिवाष्टकम्, नवरसवर्णम् आणि नवरसांनी पूर्ण असा नृत्याविष्कार अनुभवायला मिळाला.
निमित्त होते ते केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे ओडिसी आणि भरतनाट्यम् या नृत्यकलेविषयी अभ्यासपूर्ण विवेचन व प्रात्यक्षिकासह सादरीकरणाच कार्यक्रमाचे.
विद्यापीठातील नामदेव सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे, आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार, कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना रामिंदर खुराना यांनी दुर्गास्तुतीने नृत्यप्रस्तुतीला सुरुवात केली. त्यानंतर शुद्ध नृत्यप्रकारात ‘बकुलावर्णम् पल्लवी’ सादर करून खुराना यांनी राधा आणि कृष्णाच्या अमूर्त प्रितीचे वर्णन सांगणारी नृत्यप्रस्तुती सादर करून रसिकांची मने जिंकली.
आयसीसीआर आणि ललित कला केंद्र आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करनाता कल्याणी साळेकर पाटील यांच्यासह हेमांगी ठाकूर आणि मधुरा हुबळीकर.
कार्यक्रमाची सांगता सर्वशक्तीमानाशी एकरूप होणाऱ्या मुक्तीचे मोक्षनृत्य सादर करून केली. आपल्या सादरीकरणातून त्यांनी ओडिसी नृत्यशैलीचे वेगळेपण दर्शविले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भरतनाट्यम् नृत्यांगना कल्याणी साळेकर पाटील यांनी आदि शंकराचार्यांनी रचलेले ‘शिवाष्टकम्’ सादर करून नृत्यप्रस्तुतीला सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी सहकलाकार हेमांगी राकेशसिंग ठाकूर व मधुरा विष्णू हुबळीकर यांच्यासह लालगुडी जयरामन यांनी रचलेली ‘नवरसवर्णम्’ ही रचना सादर करून नवरसांचे विलोभनिय दर्शन घडविले. कल्याणी साळेकर पाटील यांनी दत्तगुरूंच्या आरतीवर नृत्यरचना सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
प्रमुख अतिथी आणि कलाकरांचे स्वागत करून राज कुमार यांनी आरसीसीआरच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता लेले यांनी केले.
जाहिरात