गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘परका’ हे विवेकनिष्ठ विद्रोहाचे उत्तम उदाहरण’ : डॉ. श्रीपाल सबनीस !
लालासाहेब जाधव लिखित ‘परका’ या आत्मकथनाचे प्रकाशन :!
पुणे : आपली आणि आपल्या समाजाची वेदना, अवहेलना, गावकुसाबाहेरचं जगणं.. यांचा अस्सल अनुभव मांडणारे ‘परका’ हे आत्मकथन म्हणजे विवेकनिष्ठ विद्रोहाचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील निवृत्त अवर सचिव लालासाहेब जाधव लिखित ‘परका’ या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी पार पडला.
परका’ या आत्मकथनपर पुस्तक प्रकाशनप्रसंगी उपस्थित लालासाहेब जाधव यांच्यासमवेत डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मण माने, यशवंत माने, नरेंद्र पवार, सुरेश खोपडे, सुनील वारे आदी.
घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरिअम येथे आयोजित समारंभात पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, उपराकार लक्ष्मण माने होते. आमदार यशवंत माने, आमदार नरेंद्र पवार, माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, डॉ. अनंत कळसे, ग्रंथालीचे मुख्य विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, वि. दा. पिंगळे, रघुनाथ जाधव, हनुमंत माने गुरुजी आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
ग्रंथाली प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
सबनीस म्हणाले, ‘संस्कृतीने, समाजाने आत्मपरीक्षण करावे, वर्षानुवर्षे चालत आलेल्या माणुसकीचा अपमान असलेल्या परंपरांचा पुनर्विचार करावा, असे हे आत्मकथन आहे. जातीचे दु:ख, अपमान आणि वेदनांचा इतिहास लालासाहेब जाधव यांनी प्रामाणिकपणे मांडला आहे. इतर कुठल्याही दु:ख, वेदनेपेक्षा या पुस्तकातील ‘परकेपण’ आणि ‘पोरकेपण’ भयंकर आहे कारण ते मानवनिर्मित आहे. जाधव यांनी सोप्या भाषेत हे अनुभव मांडले आहेत, पण त्यात दु:ख कुरवाळत बसण्यापेक्षा समाजाची संवेदनशीलता जागी व्हावी, हे अभिप्रेत आहे,’.
मनोगत मांडताना जाधव यांनी वैयक्तिक अनुभव हे माध्यम आहे, कैकाडी समाजाची दशा काय आहे, हे सांगण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. ‘जे भोगले, जे सोसले, ते सांगितले. पराकोटीच्या अपमानित जिण्याचे अनुभव घेत, शिक्षणाच्या माध्यमातून आपण यशस्वी होऊ शकतो, हे पण सांगावेसे वाटते म्हणून लिहिले. अंध वडिलांनी प्रेरणा दिली आणि अशिक्षित आईने शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. गेल्या कित्येक वर्षांपासून कैकाडी समाजाला राज्य आणि केंद्र सरकारनेही ‘परके’ ठेवले आहे, त्याविरोधात माझे प्रयत्न सुरू असल्याचेही जाधव म्हणाले.
नरेंद्र पवार म्हणाले, ‘या पुस्तकाच्या माध्यमातून कैकाडी समाजाची दुरवस्था सर्वांपर्यंत पोचेल. याच्या वाचनाने भटक्या विमुक्तांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल,’.यशवंत माने यांनी ‘कैकाडी समाजाला क्षेत्रीय मर्यादांच्या बंधनातून मुक्त करावे, यासाठी लालासाहेब जाधव यांनी केलेल्या प्रयत्नांची, अहवालाची माहिती दिली.
खोपडे यांनी जाधव कुटुंबासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ‘कैकाडी समाजासमोर आजही किती सुधारलो किती पुढारलो, हे प्रश्न आहेत, असे ते म्हणाले. कळसे म्हणाले, ‘जाधव यांच्या सोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी पुस्तकाचे शीर्षक ‘परका’ असे ठेवले असले तरी वाचक हे पुस्तक ‘आपलेसे’ करतील, याची खात्री आहे,’.
अध्यक्षीय समारोप करताना लेखक लक्ष्मण माने म्हणाले, ‘कैकाडी समाजातील व्यक्तीला आपले अनुभव पुस्तकरूपाने लिहावेसे वाटतात, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देणे आहे. ही ताकद आपल्याला संविधानाने दिली आहे. शिक्षणाचा अधिकार संविधानानेच प्रदान केला आहे. आपल्या दु:खाचे कारण शोधले, की शिक्षणाने त्यावर उपाय शोधता येतो, हे लक्षात ठेवले पाहिजे,’.
पिंगळे, सुरेश विश्वकर्मा, धनंजय जाधव, बाळासाहेब खोपडे आदींनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथाली प्रकाशनातर्फे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले.
अश्विनी भोईर यांनी सूत्रसंचालन केले.
जाहिरात