गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नव्या वर्षाच्या शुभारंभास रंगणार स्वरझंकार महोत्सव !
पुणे : एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी व व्हायोलिन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4,5,6 व 7 जानेवारी रोजी कोथरूड येथे स्वरझंकार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे यंदाचे 15वे वर्ष आहे. भारतात एकूण 40 ठिकाणी स्वरझंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. भारतातील नवोदित तसेच ख्यातनाम कलाकार या महोत्सवात आपली हजेरी लावत असतात.
नव्या वर्षाच्या शुभारंभाला ही सुरमयी मेजवानीच रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे, अशी माहिती स्वरझंकारचे तेजस व राजस उपाध्ये यांनी दिली. महोत्सव एमआयटी वर्ल्ड पिस युनिर्व्हसिटीच्या आवारात आयोजित करण्यात आला असून सुरुवात दररोज सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
गुरुवार दि. 4 जानेवारी रोजी कै. काणे बुवा व पंडित उल्हास कशाळकर यांच्या शिष्या विदुषी मंजुषा कुलकर्णी पाटील, स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंदगंधर्व आनंद भाटे तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र पंडित शौनक अभिषेकी यांचे स्वतंत्र गायन तसेच नंतर या तीनही दिग्गज कलाकारांचे सहगायन होणार आहे. त्यानंतर इटावा घराण्याचे उस्ताद शाहिद परवेझ यांचे शिष्य शाकीर खान यांच्या सतार वादनाने पहिल्या दिवसाचा समारोप होणार आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 5 जानेवारी रोजी मेवाती घराण्याचे लोकप्रिय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांचे गायन तसेच लोकप्रिय सतारवादक पंडित पुर्बायन चॅटर्जी यांचे सतारवादन होणार असून त्यानंतर जगप्रसिद्ध लोकप्रिय सुफी गायक मामे खान यांचे गायन रसिकांना ऐकायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवसाचा समारोप मामे खान व पुर्बायन चॅटर्जी यांच्या गायन-वादनाच्या जुगलबंदीने होणार आहे.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, शनिवार दि. 6 जानेवारी रोजी कार्यक्रमाची सुरुवात जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका पंडिता अश्विनी भिडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर जागतिक कीर्तीचे मोहनवीणा वादक पद्मभूषण पंडित विश्वमोहन भट यांचे वादन तसेच लोकप्रिय गझल गायक हरिहरनजी यांचे गझल गायन होणार असून हरिहरनजी आणि विश्वमोहन भट यांच्या एकत्रित सादरीकरणाने तिसऱ्या दिवसाचा समारोप होणार आहे.
रविवार दि. 7 जानेवारी रोजी कार्यक्रमाची सुरुवात व्हायोलिन ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध पावलेल्या तेजस व राजस उपाध्ये यांच्या व्हायोलिन वादनाने होणार आहे. त्यानंतर लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांची गायन मैफल होणार आहे. या मैफलीद्वारे रसिकांना शास्त्रीय व नाट्यसंगीताची पर्वणी मिळणार आहे. त्यानंतर जगप्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांचे एकल बासरी वादन होणार असून महोत्सवाची सांगता राकेश चौरसिया व राहुल देशपांडे यांच्या जुगलबंदीने होईल.
कार्यक्रमाच्या प्रवेशिका bookmyshow.com व classicalevents.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 8805745962 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जाहिरात