गोल्डन आय न्यूज नेटवर्क
अमरुच्या काव्यातील भावभावनांचे सूक्ष्म टिपण म्हणजे ‘अमरुची प्रेमकविता’ : डॉ. अरुणा ढेरे !
‘अमरुशतकम्’ संस्कृत काव्याच्या डॉ. लिली जोशी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : संस्कृत कवी अमरुच्या काव्याचा पैस लहान आहे; पण काळाच्या हातातून निसटलेल्या त्याच्या साहित्यकृतीच्या खुणा डॉ. लिली जोशी यांनी संशोधकाच्या भूमिकेतून शोधल्या आहेत. अमरुच्या काव्यातील भाव त्यांनी सूक्ष्मपणे उचलले आहेत.
संस्कृत श्लोकांचा काव्यात अनुवाद करणे हे काम कठीण आहे. अमरुच्या काव्यातील भावभावनांचे सूक्ष्म टिपण म्हणजे ‘अमरुची प्रेमकविता’, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष, ख्यातनाम लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी काढले.प्रतिभावान संस्कृत कवी अमरु यांच्या ‘अमरुशतकम्’ या काव्याचा मराठी अनुवाद आणि रसग्रहण असलेल्या डॉ. लिली जोशी लिखित ‘अमरुची प्रेमकविता’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. ढेरे यांच्या हस्ते झाले.
अमरुची प्रेमकविता’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) लेखिका डॉ. लिली जोशी, डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. ज्योत्स्ना खरे, डॉ. हेमा डोळे, मेधा राजहंस.
त्या वेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. डॉ. जोशी यांच्यासह भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या ‘भागवत पुराण’ संशोधन प्रकल्पाचे प्रमुख आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘पाली आणि बौद्धविद्या’ विभागातील संलग्न प्राध्यापक डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. हेमा डोळे, डॉ. ज्योत्स्ना खरे, उन्मेष प्रकाशनच्या संचालिका मेधा राजहंस यांची प्रमुख उपस्थिती होती. एस. एम. जोशी सभागृह, कॉन्फरन्स हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या अमरुने संस्कृत काव्यातून नायक-नायिकेचे मनोज्ञपणे मांडलेले भावविश्व, सजीव रसरशीत भावगर्भ संदर्भ डॉ. लिली जोशी यांनी उलगडत अमरुच्या काव्यातील बारकावे मराठीत भाषांतरित आणि रसग्रहण करून वाचक, अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. डॉ. जोशी यांच्या भाषांतरात बहुश्रुतता जाणवते.
अमरुच्या रचनांमधील सौंदर्य अनुवादातूनही प्रकट होते. भारतीय अभिजात परंपरेतील सौंदर्यस्थळे जपत केलेला हा रसग्रहणपूर्ण अनुवाद अभिनंदनीय आहे.
डॉ. श्रीकांत बहुलकर म्हणाले, अमरु या कवीने मुक्तक हा काव्यप्रकार हाताळला आहे.
ज्यात आशयाला महत्त्व आहे. म्हणूनच संस्कृत साहित्यामध्ये अमरुची मुक्तकंठाने स्तुती झाली आहे. डॉ. जोशी यांनी केलेल्या अनुवाद व रसग्रहणातून अमरुच्या लिखाणाची प्रसन्न शैली प्रकर्षाने दिसून येते.
डॉ. लिली जोशी यांनी लेखन प्रवास उलगडून दाखविला. अमरु याच्या काव्यातील भावभावनांचे मनोज्ञ दर्शन डॉ. जोशी यांच्या लिखाणातून होत असल्याचे डॉ. हेमा डोळे यांनी सांगितले. डॉ. ज्योत्स्ना खरे यांनी अमरु याच्या काव्याचा डॉ. जोशी यांनी केलेला भावानुवाद कथन केला.
प्रकाशिका मेधा राजहंस यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा सत्कार डॉ. लिली जोशी यांनी केला तर आभार डॉ. नरेंद्र जोशी यांनी मानले. सूत्रसंचालन सुनीला गोंधळेकर यांनी केले.
जाहिरात