गोल्डन आय न्युज नेटवर्क
पुनर्विकासात पारदर्शकता आणि सभासदांचे मत महत्त्वाचे
गंगोत्री होम्स ॲण्ड हॉलिडेजतर्फे आयोजित रि-डेव्हल्पमेंटविषयी चर्चासत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन !
पुणे : सोसायटीचा पुनर्विकास करताना सोसायटीच्या सर्वसाधारण सभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोसायटीच्या पुनर्विकासासंदर्भात 79(अ) या कलमामध्ये पारदर्शकतेला महत्त्व दिले असल्याने हे कलम पुनर्विकासात उपयुक्त ठरू शकते.
सोसायटीच्या पुनर्विकासाला सुरुवात करताना वास्तुविशारद, कायदेविषयक सल्लागार आणि चार्टर्ड अकौंटंट हे तीनही घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. सोसायटीलगतच्या रस्त्याच्या रुंदीनुसारच्या नियमांप्रमाणे एफएसआय दिला जातो हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे मुद्दे कासा प्रॉपर्टी फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रि-डेव्हल्पमेंटविषयीच्या चर्चासत्रात समोर आले.
गंगोत्री होम्स ॲण्ड हॉलिडेज्तर्फे गोल्डन लीफ, शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पुलाजवळ तीन दिवसीय ‘कासा प्रॉपर्टी फेस्टिव्हल 2.0’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज (दि. 25) रि-डेव्हल्पमेंटविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात रोहिदास गव्हाणे (कार्यकारी अभियंता, पुणे महानगरपालिका), स्नेहा जोशी (डेप्युटी रजिस्ट्रार, कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी), आर्किटेक्ट हर्षल कवडिकर (रि-डेव्हल्पमेंट कन्स्लटंट) आणि कर्नल (निवृत्त) कुमार फुले यांचा सहभाग होता.
पुनर्विकास का करावा, टीओडी, नॉन टीओडी झोन म्हणजे काय, रि-डेव्हल्पमेंटचा निर्णय झाल्यानंतर काही जणांची संमती तर काही जणांचा विरोध या प्रश्नातून मार्ग कसा काढावा या विषयी असलेले नियम, पुनर्विकास प्रक्रियेची सुरुवात, विकसकाची निवड कुठल्या निकषांवर करावी, प्लॅन मंजूर प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे, सहकार कायद्यातील सुधारणांचा उपयोग आदी मुद्द्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तज्ज्ञांशी मिलिंद देशपांडे यांनी संवाद साधला.
गंगोत्री होम्स ॲण्ड हॉलिडेज् आयोजित ‘कासा प्रॉपर्टी फेस्टिव्हल 2.0’मध्ये रि-डेव्हल्पमेंटवरील चर्चासत्रात सहभागी (डावीकडून) मिलिंद देशपांडे, कर्नल कुमार फुले, रोहिदास गव्हाणे, स्नेहा जोशी, हर्षल कवडिकर.
गंगोत्री होम्स ॲण्ड हॉलिडेज्चे संचालक गणेश जाधव यांनी प्रास्ताविकात पुनर्विकासनाविषयी बोलले गेले पाहिजे, पुनर्विकसनासाठी लागणारी कागदपत्रे, सरकारी धोरणे, टिओडी म्हणजे काय, विकसक नेमण्याची प्रक्रिया काय असावी या विषयांवर चर्चा होणे आवश्यक असल्याने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
मान्यवरांचा परिचय संचालक मकरंद केळकर यांनी करून दिला तर सन्मान संचालक राजेंद्र आवटे व गणेश जाधव यांनी केला.
रोहिदास गव्हाणे यांनी टीओडी झोन व नॉन टिआडी झोन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना सरकारची धोरणे, मिळकतींना पुनर्विकासात मिळणारा वाढीव एफएसआय, त्याविषयीचे नियम या विषयी उपस्थितांना अवगत केले.
शहरात मेट्रोची सुविधा झाल्याने मेट्रो स्टेशन लगतच्या 500 मीटरच्या भागातील विकासाला अधिक चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सूचित केले.नियम 79 (अ) मधील तरतूदींविषयी माहिती सांगताना स्नेहा जोशीयांनी याविषयीची पारदर्शकता अधोरेखित केली. पुनर्विकासाची सुरुवात झाल्यापासून घराचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत 79 (अ) नियमामध्ये मार्गदर्शक सूचना दिलेल्या असून त्यानुसार प्रत्येक सभासदाला वेळोवेळी पुनर्विकासाच्या टप्प्यांविषयी माहिती देणे आवश्यक आहे.
कारण निर्णयांमध्ये पारदर्शकता असेल तर पुनर्विकास करताना अडचणी येत नाहीत. या अनुषंगाने वेळोवेळी सोसायटीच्या सर्वसाधारण सभा घेतल्या जाव्यात या मुद्द्याकडे लक्ष वेधले. सभासदाचा हक्क, प्रक्रियेमधील पारदर्शकता आणि गरज पडल्यास समुपदेशन हे पुनर्विकासातील महत्त्वाचे टप्पे ठरतात.
सोसायटीचा पुनर्विकास करताना सभासदांचे व मूळ जागेचे टायटल बघणे महत्त्वाचे असते असे सांगून हर्षल कवडिकर म्हणाले, पुनर्विकास करताना या प्रक्रियेचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. विकसकाची निवड करताना त्याच्या कामाची गुणवत्ता, त्याची आर्थिक कुवत, विश्वासार्हता, गुणात्मकता हे पाहून त्याने दिलेली ऑफर याचा सारासार विचार केला जावा. विकसक नेमण्याचा अधिकार पूर्णपणे सोसायटी सभासदांचा असतो.
रि-डेव्हल्पेंटविषयी विचार करताना बदलत्या काळानुसार सोयीसुविधा, गरज आणि विकसकावरील विश्वास या मुद्द्यांकडे कुमार फुले यांनी लक्ष वेधले. आभार राजेंद्र आवटे यांनी मानले.
जाहिरात