गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुण्याईमुळे डॉ. भालचंद्र भागवत यांना पुरस्काररूपी फळ : डॉ. श्रीपाल सबनीस !
बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे डॉ. भालचंद्र भागवत यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार प्रदान !
पुणे : सत्याची पूजा, सेवेचा धर्म आणि ज्ञानाची लालसा ही त्रिसूत्री डॉ. भालचंद्र भागवत यांनी अंगिकारलेली आहे. पुण्याईच्या भूमिकेचे त्यांना फळ मिळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी जी पावले उचलली त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ, माजी प्राचार्य डॉ. भालचंद्र भागवत यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार आज (दि. 25) डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
टिळक आयुर्वेद महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक होते.
बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित आयुर्वेदभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) डॉ. सरोज पाटील, डॉ. संभाजी मलघे, महेंद्र भारती, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. भालचंद्र भागवत, डॉ. दिलीप पुराणिक, डॉ. भीम गायकवाड
इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सरोज पाटील, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भीम गायकवाड आणि बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, कवी उद्धव कानडे व्यासपीठावर होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. भागवत यांचे कार्य जसे मोठे आहे त्याचप्रमाणे माणूस म्हणून त्यांचे सेवाभावनेने सुरू असलेले कार्य समाजाला दिशा देणारे आहे. आपला देश आयुर्वेदाची जन्मभूमी आहे. आयुर्वेद शास्त्राचे जे ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे ते टिकविण्याचा तसेच पुढील पिढीला देण्याचे मोठे कार्यही डॉ. भागवत आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून घडत आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. भालचंद्र भागवत म्हणाले, सेवा हाच धर्म या भावनेतून आजपर्यंत कार्य करीत आलो आहे. सामाजिक भावनेतून कार्य करीत असताना त्यातून किती पैसा मिळेल याचा कधीही विचार केला नाही. आयुर्वेदभूषण पुरस्कार हा माझ्या कार्याचा गौरव आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. दिलीप पुरणिक यांनी डॉ. भागवत यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. भीम गायकवाड, डॉ. संभाजी नलगे, डॉ. सरोज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी उपस्थितांचा सत्कार करून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकात विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
दरवर्षी दिला जाणार पुरस्कार
बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे दिल्या गेलेल्या आयुर्वेदभूषण पुरस्काराचे यंदाचे पहिले वर्ष असून शिक्षण, वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीस बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मानाचा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे, असे बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकात सांगितले.
बाबा भारती यांचे विचार पुरोगामी महाराष्ट्राचा जिवंत वसा आणि वारसा आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निकट सहकारी म्हणून बाबा भारती यांचे योगदान महाराष्ट्राला परिचित आहे. पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार म्हणून बाबा भारती यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे पुत्र महेंद्र भारती ही चळवळ चालवत आहेत.
जाहिरात