गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संमेलनाच्या माध्यमातून संत चोखोबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचतील : हभप माणिकबुवा मोरे महाराज !
संत चोखामेळा साहित्य संमेलनानिमित्त संत चोखामेळा महाराज उत्सव मूर्तीचे लोकार्पण !
पुणे : भगवंताने संतांना आपलेसे केले पण समाजाने संतांना आजही आपलेसे केले नाही याची खंत वाटते. संत चोखामेळा यांचे साहित्य, चरित्र, भक्ती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आळंदी येथे आयोजित केलेले साहित्य संमेलन उपयुक्त ठरेल, असा विश्वास जगतगुरू तुकोबाराय यांचे वंशज ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर यांनी व्यक्त केला.
वृंदावन फाऊंडेशन आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्रातर्फे संत चोखामेळा महाराज उत्सव मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर, प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी, ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे, ॲड. विकास ढगे-पाटील, ह. भ. प. त्रिगुण महाराज गोसावी, सचिन पाटील, सुनिता कुचिक, रघुनाथ कुचिक, श्रीरंग गायकवाड, दीपक जेवणे, निलेश गद्रे, ह. भ. प. योगिनीताई मोरे आदी.
वृंदावन फाऊंडेशन आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्रातर्फे दि. 18 आणि दि. 19 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आज (दि. 16) संत चोखामेळा महाराज उत्सव मूर्तीचा लोकार्पण सोहळा कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
मूर्तीचे लोकार्पण ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य डॉ. पुजारी होते.
संत चोखामेळा महाराज यांची साकारण्यात आलेली मूर्ती.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील, संत सोपानदेव महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. त्रिगुण महाराज गोसावी, ह. भ. प. योगिनीताई मोरे, संमेलनाचे निमंत्रक सचिन पाटील, माजी खासदार सुनील गायकवाड, सुनिता कुचिक, रघुनाथ कुचिक, श्रीरंग गायकवाड, निलेश गद्रे, दीपक जेवणे आदी उपस्थित होते.
संत चोखामेळा यांची मूर्ती साकारणारे कलावंत विक्रम वाघमोडे यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
संत चोखामेळा यांच्या मूर्तीतून शुद्ध भाव प्रकट होत आहेत, असे सांगून ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज यांनी आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
संत हे विचाररूपाने सर्वसामान्यांच्या हृदयात राहिले पाहिजे. संतांची शिकवण आत्मसाद करण्यासाठी त्यांच्यासमोर भक्तिभावाने नतमस्तक व्हावे, असे मत प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी यांनी व्यक्त केले.
संतांचे विचार हे समाजाला एका धाग्यात बांधणारे आहेत, असे रघुनाथ कुचिक म्हणाले. श्रीरंग गायकवाड, डॉ. सुनील गायकवाड, निलेश गद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस संमेलनाचे निमंत्रक सचिन पाटील यांनी आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मोटे महाराज यांनी केले तर सिद्धेश्वर माने यांनी आभार मानले.
———————————————————–जाहिरात