गोल्डन आय न्युज नेटवर्क
सांगीतिक मैफल ठरली रसिकांसाठी पर्वणी
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम !
पुणे : प्रतिभावान हिंदुस्थानी शास्त्रीय गायक व संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सांगीतिक मैफल रसिकांसाठी पर्वणी ठरली.
स्वरांजली, गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णू विनायक स्वरमंदिरातया मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र आणि शिष्य पंडित शौनक अभिषेकी तसेच अभिषेकीबुवा यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. मोहनकुमार दरेकर यांचे शास्त्रीय गायन तर डॉ. विश्वास कुलकर्णी यांचे बासरीवादन झाले. कलाकरांना सुभाष कामत, मंदार पुराणिक (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), मयुर महाजन, निषाद व्यास, अभेद अभिषेकी, सत्यजित बेडेकर, राज शहा यांनी साथसंगत केली. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मैफलीची सुरुवात डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्या बासरीवादनाने झाली. सुरुवातीस त्यांनी राग बिहाग सादर केला. त्यानंतर चंद्रमोळी रागातील एक गत सादर केली. पिलू रागाची झलक ऐकवून मुलतानी रागातील संगीत मत्स्यगंधा या नाटकातील पदाने वादनाची सांगता केली.
त्यानंतर पंडित डॉ. मोहनकुमार दरेकर यांनी पंडित अभिषेकीबुवा यांच्या आठवणींना उजाळा देऊन गुरुस्मरण करीत भिन्नषडज् रागातील ‘का ऐसे भयी मोरी’ ही बंदिश ताल विलंबित रूपक तर स्व:त रचित ‘सखिया मन मोरा विकल भायो है’ ही त्रितालातील बंदिश सादर केली.
गुरूंचा अंश असलेल्या आणि कलाकाराचे स्वतंत्र विचार दर्शविणाऱ्या गायकीचे दर्शन त्यांच्या सादरीकरणातून घडले. त्यानंतर ‘याद पियाकी आए’ ही सुप्रसिद्ध ठुमरी सादर करून त्यांनी रसिकांची वाहवा मिळविली.
‘अशी ही सखी सहचरी’ हे मीरा मधुरा या नाटकातील पद सादर करून डॉ. दरेकर यांनी त्यांच्या सादरीकरणाची सांगता गंगाधर महांबरे यांच्या ‘हृदयात फुले माझिया दिन रात खुले जोगिया’ ही राग जोगीयातील मराठी बंदिश करून केली.
ही रचना डॉ. दरेकर यांनीच स्वरबद्ध केलेली आहे.
पंडित शौनक अभिषेकी यांनी मैफलीची सुरुवात ‘रैन की बात मै कैसे कहूं’ या सरस्वती रागातील बंदिशीने केली. हा राग खुलवत नेताना त्यांनी रूपक, ख्याल, आधा तीनताल आणि दृत सादर करीत रागाचा मुड कसा पकडायचा हे तंत्र उलगडले.
साधरणत: ठुमरीचे राग खमाज, पिलू, काफी, पहाडी ऐकिवात असतात परंतु शौनकजींनी कलावती, झिंजोटी आणि खमाज या रागांची झलक दाखवत ‘कित गए शाम री मैं तो हारी नेहा’ ही ठुमरी ऐकवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मैफलीची सांगता पंडित अभिषेकी यांनी ‘सर्वात्मक सर्वेश्वरा’ या भैरवीने करताना अभिषेकीबुवांच्या गायकीची दर्शन घडविले.
सुमारे 35 वर्षांपूर्वी गांधर्व महाविद्यालयातील स्वरमंचावर केलेल्या सादरीकरणाला शौनक अभिषेकी यांनी उजाळा दिली. त्या वेळीही त्यांना सुभाष कामत यांची तबलासाथ होती.
कलाकरांचा सत्कार गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांच्या हस्ते करण्यात आला. नेमके आणि सुनियोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन प्रज्ञा देशमुख-कामतीकर यांनी केले.
जाहिरात