गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मराठी रंगभूमीदिनी कलाकारांनी बांधली नाट्यसंगीतातून पूजा
भरत नाट्य मंदिर आयोजित ‘पंचतुंड ते सर्वात्मका’ कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद !!
पुणे : ‘लागी कलेजवा कट्यार’, ‘परवशता पाश दैवे..’, ‘पतीत तू पावना’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘तारिणी नव वसन धारिणी’, ‘निराकार ओंकार’, ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘उगवला चंद्र पुनवेचा’ अशी एकाहून एक सरस आणि लोकप्रिय नाट्यगीते तसेच संगीत नाटकांमधील अभंगरचना सादर करून संगीत रंगभूमी गाजवित असलेल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ तसेच युवा कलाकारांनी मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्यगीतांच्या रूपाने रंगदेवतेला अर्घ्य अर्पण केले.
रंगभूमीदिनानिमित्त भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे रविवारी (दि. 5) ‘पंचतुंड ते सर्वात्मका’ या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचे भरत नाट्य मंदिरात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डॉ. चारुदत्त आफळे, गौरी पाटील, संजीव महेंदळे, कविता मेहेंदळे, हृषिकेश बडवे, सावनी दातार, भक्ती पागे, निधी घारे, अनुष्का आपटे यांचा सहभाग होता. राहुल गोळे (ऑर्गन), प्रसाद करंबेळकर (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली तर अभय जबडे यांनी ओघवत्या शैलीत संगीत रंगभूमीचा इतिहास उलगडत नेला.
रंगभूमीदिनानिमित्त भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे आयोजित ‘पंचतुंड ते सर्वात्मका’ या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात नांदी सादर करताना कलाका र
कार्यक्रमाची सुरुवात संगीत शाकुंतल या नाटकातील ‘पंचतुंड नररुंडमालधर’ या नांदीने झाली. संगीत सौभद्रमधील ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’, संगीत होनाजी बाळामधील सुप्रसिद्ध गौळण ‘श्रीरंगा कमलाकांता’ संगीत स्वयंवरमधील ‘नरवर कृष्णासमान’, ‘लपविला लाल गगन’, संगीत बावनखणीमधील ‘प्रितीचा कल्पतरू जो मला लाभला’, संगीत पाणिग्रहणमधील ‘उगवला चंद्र पुनवेचा’,
संगीत सुवर्णतुलामधील ‘रतीहूनसुंदर मदनमंजिरी’, संगीत मदनाची मंजिरीमधील ‘ऋतुराज आज वनी आला’, संगीत कुलवधूमधील ‘मधुसुदना मनरमणा’, संगीत जयजय गौरीशंकरमधील ‘निराकार ओंकार’, संगीत पट-वर्धनमधील ‘तारिणी नव वसन धारिणी’, संगीत हे बंध रेशमाचेमधील ‘सजणा का धरिला परदेस’, संगीत ययाती देवयानीमधील ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, संगीत कान्होपात्रामधील ‘पतित तु पावना’, संगीत कट्यार काळजात घुसलीमधील ‘मुरलीधर श्याम हे नंदलाल’, ‘लागी कलेजवा कट्यार’ ही नाट्यपदे तसेच संगीत गोरा कुंभारमधील ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हा अभंग सादर करून मराठी संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल परंपरेचे दर्शन रसिकांना घडविले.
‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या संगीत रंगभूमीवरील पसायदान समजल्या जाणाऱ्या भैरवीने या भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. कलाकरांच्या सादरीकरणाला रसिकांनी मनमुराद दाद देत वैभवशाली परंपरा असणाऱ्या मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास पुन्हा एकदा अनुभवला.
जाहिरात