गोल्डन आय न्यूज नेटवर्क
इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फाळणीनंतरच्या अराजकतेचा दिला होता अंदाज!
रणजित सावरकर यांचे प्रतिपादन : ‘शतपैलूचे तेजपर्व’ संवादात्मक कार्यक्रामात उलगडले स्वातंत्र्यवीरांचे विविध पैलू !!
पुणे : इतिहासकार म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर थोर होते. इतिहास अभ्यासताना त्यांच्या मनात राजकीय विचारांची मुळे रुजली. समाज-देश अवनतीपर्यंत का पोहोचला याचा विचार त्यातूनच सुरू झाला. ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर द्यावे हे इतिहासातील काही संदर्भांमधून सावरकर शिकले.
देशाच्या फाळणीमुळे अराजक माजेल हा अंदाज इतिहासकार सावरकरांनी अभ्यासातूनच व्यक्त केला होता, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले. इतिहासकार सावरकर यांनी केलेली भाकिते आजच्या सामाजिक-राजकीय स्थितीतीही तंतोतंत लागू होत आहेत, असेही त्यांनी निर्देशित केले.
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना रणजित सावरकर. समवेत श्रीनिवास कुलकर्णी, मंजिरी मराठे, सात्यकी सावरकर, अक्षय जोग.
श्रीनिवास कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि. 29) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर ‘शतपैलूचे तेजपर्व’ या संवादात्मक विशेष कार्यक्रमाचे आयोजन अश्वमेध हॉल येथे करण्यात आले होते. त्या वेळी रणजित सावरकर हे ‘इतिहासकार सावरकर’ या विषयावर बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर, सावरकर साहित्य अभ्यासक अक्षय जोग आणि वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी होत्या. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी व्यासपीठावर होते. यावेळी ‘तेजपर्व’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सावरकर यांच्या वैचारिकतेचे दाखले देऊन रणजित सावरकर पुढे म्हणाले, विजय विसरलात तरी चालेल पण पराभव कधीही विसरू नका ही सावरकर यांची शिकवण होती, कारण पराभवातूनच केलेल्या चुका वारंवार न करण्याचे आकलन होत असते. म्हणूनच इतिहासाचे वाचन करताना फक्त ज्ञान संपादन करावे हा हेतू न ठेवता बुद्धिवाद वापरून प्रत्येक संदर्भाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे, अशी त्यांची विचारसरणी होती असेही त्यांनी नमूद केले.
सामाजिक क्रांती आणि विज्ञाननिष्ठा या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पैलूंविषयी बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले, सावरकर यांची विज्ञाननिष्ठा आजच्या काळातही न झेपणारी आहे. त्यांनी आपल्या विचारसरणीतून ठोस वैज्ञानिक दृष्टी दिली. यंत्रयुगाचा पुरस्कार केला. रुढी-परंपरांना विरोध करताना समाजरोष पत्करला. सुदृढ समाजनिर्मितीसाठी आडकाठी ठरणाऱ्या अनेक अनिष्ट प्रथांना विरोध केला. राजकारणाच्या चढत्या तलवारीला समाजकारणाच्या बचावात्मक ढालीचा वापर करावा या विचाराने ते कार्यरत राहिले.
अक्षय जोग ‘हिंदुत्वनिष्ठ सावरकर’ या विषयी बोलताना म्हणाले, सावरकरांचे हिंदुत्व हा अभ्यासला न गेलेला विषय आहे. त्यामुळे यावर सखोल अभ्यास होऊन त्यांचे हिंदुत्वाविषयीचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. सावरकर राजकीय व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी हिंदुंमध्ये राजकीय जागृती निर्माण केली. संविधानाचे शस्त्र वापरत योग्य व्यक्तीला मत देऊन देशात सत्तापालट करता येते याविषयी त्यांनी हिंदुना अवगत केले होते.
सावरकर यांना मराठी कवींच्या मांदिआळीत अग्रस्थान असल्याचे सांगून ‘महाकवी सावरकर’ विषयावर बोलताना मंजिरी मराठे यांनी सावरकर यांच्या काव्यलेखनाचा सूक्ष्म आढावा घेतला. सावरकर यांनी केलेले सवाई माधवराव पेशवे यांच्यावरील काव्य, स्वदेशीचा फटका, चापेकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांच्यावर केलेला पोवाडा, बंदिकाळात रचलेले महाकाव्य याविषयी विवेचन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना अनुसरून आजच्या काळात मार्गक्रमण करत त्यांची धर्माविषयीची बुद्धिनिष्ठ व्याख्या आत्मसात करणे आवश्यक आहे.
पराग जोशी, नेहा गाडगीळ, सौरभ दुराफे, ऋचा गोडबोले, श्वेता कुलकर्णी, अतुल रेवणीकर, कृष्णा वैद्य, विशाल कुलकर्णी, गोकुळ लामतुरे, अश्विनी क. कुलकर्णी, गणेश गाडे यांना संस्थेचे नियुक्तीपत्र देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सहवास लाभलेल्या गोविंद जतकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. मान्यवरांचा सत्कार योगेश पाटील, तेजस शुक्ल, श्रीराम जोशी, निशिगंधा आठल्ये, विशाल कुलकर्णी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी तर आभार विक्रम दिवाण यांनी मानले.
जाहिरात