गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त
गानवर्धनतर्फे शुक्रवारी ‘संगीत भूषण : एक संस्मरण’ विशेष कार्यक्रम !!
पुणे : चतुरस्र, घरंदाज शास्त्रीय ख्याल गायक, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते, गुरू, वाग्येयकार, संगीतकार पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गानवर्धन, पुणे आणि संगीत भूषण पंडित राम मराठे फाऊंडेशनतर्फे शुक्रवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी ‘संगीत भूषण : एक संस्मरण’ या विशेष कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
सांगीतिक कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून पंडित राम मराठे यांची गायन कारकीर्द मैफलींमधील छायाचित्रे, ध्वनीमुद्रण, चित्रिकरण यासह आठवणी-किस्से आणि प्रत्यक्ष सादरीकरणातून उलगडणार आहे. या सांगीतिक कार्यक्रमात मुकुंद मराठे, भाग्येश मराठे, स्वरांगी मराठे, श्रुती मराठे, संजय मराठे, राजेंद्र मणेरीकर, मृणाल नाटेकर-भिडे, कु. आदीश्री पोटे यांचा सहभाग असून लीलाधर चक्रदेव (संवादिनी), माधव मोडक (तबला), संजय गोगटे (ऑर्गन) हे साथसंगत करणार आहेत. कलाकारांशी स्वाती मराठे संवाद साधणार आहेत.
संगीत भूषण पंडित राम मराठे
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. हाच कार्यक्रम रविवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.पंडित राम मराठे यांना लहानपणापासून संगीत कलेविषयी ओढ निर्माण झाली. त्यांच्यावर वडिल पुरुषोत्तम आणि काका गजानन मराठे यांच्याकडून गाण्याचे व अभिनयाचे संस्कार झाले.
सुरुवातीस त्यांनी मुळे यांच्याकडून गाण्याचे व अंबीटकर यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले. त्यांची ज्येष्ठ भगिनी गोदावरी ही गोपाळ गायन समाज येथे शास्त्रीय संगीत शिकायला असे. तिच्याबरोबर ते ठेका धरायला जात असत. त्या काळातील गाजलेल्या ध्वनिमुद्रिका श्रवण करून त्याचे हुबेहुब अनुकरण ते करत व लहान मोठ्या कार्यक्रमात आपली कला सादर करत.
शास्त्रीय संगीत आत्मसात केल्यानंतर राम मराठे यांनी ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली व अमृतसर येथील शास्त्रीय संगीत संमेलनांमध्ये भाग घेतला. नटवर्य गणपतराव बोडस यांच्या आग्रहास्तव त्यांनी संगीत सौभद्र या नाटकातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. राम मराठे यांना अनेक मानसन्मानही लाभले आहेत. त्यांचा सांगीतिक वारसा त्यांचे दोन पुत्र संजय व मुकुंद तसेच सुशीला मराठे-ओक व वीणा मराठे-नाटेकर या कन्या आणि नातवंडे पुढे चालवित आहेत.
जाहिरात