गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘महाराष्ट्रधर्मा’चा जयजयकार करत रंगला ‘सावरकर ते शिरवाडकर’ सांगीतिक कार्यक्रम !
पुणे पुस्तक महोत्सव आयोजित कार्यक्रम : संवाद, पुणेची निर्मिती !
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी लेखणीतून उतरलेल्या ओजस्वी रचनांपासून कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी कवितांपर्यंतचा मराठी भाषेचा गौरवशाली प्रवास बुधवारी ‘सावरकर ते शिरवाडकर’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमातून उलगडला.
सर्व समाजघटकांना सामावून घेत विश्वकल्याणाचा संदेश देणारी संतांची सुगम सोपी मराठी, क्रौर्याला शौर्याने नमविणारी खणखणीत आणि तळपणारी मराठी, मोकळाढाकळा शृंगार मांडणारी शाहिरी मराठी, पुराणकथा, लोककथा, इतिहास यातून संवाद साधणारी, संस्कार करणारी, नाती समजावणारी मराठी, अशी मराठी भाषेची अनेक रूपे या कार्यक्रमातून प्रकट झाली.
मराठी राजभाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुणे पुस्तक महोत्सव आयोजित आणि संवाद, पुणे निर्मित ‘सावरकर ते शिरवाडकर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते.
गीत-संगीत, अभिवाचन, कविता, पोवाडा यांचा समावेश असलेला कार्यक्रम रसिकांच्या उदंड उपस्थितीत सादर करण्यात आला. पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य धोंडीराम पवार, देविदास वायदांडे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली
या कार्यक्रमाची संकल्पना संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची होती तर सूत्रधार निकिता मोघे होत्या. संहिता लेखन आणि निवेदन अक्षय वाटवे यांचे होते. चैत्राली अभ्यंकर, संजीव मेहेंदळे, सुजित सोमण यांनी विविध गीते सादर केली. केदार परांजपे (की-बोर्ड), दिप्ती कुलकर्णी (संवादिनी), राजू जावळकर (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्य) यांनी साथसंगत केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, माधुरी सहस्रबुद्धे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, उठी उठी गोपाला, वासुदेव आला, सुंदर ते ध्यान, खेळ मांडियेला वाळवंटी ठायी, विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, माझी माय सरसोती, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, मराठी पाऊल पडते पुढे, ऐरणीच्या देवा तुला, स्वये श्रीराम प्रभू ऐकती, राम जन्मला गं सखी, पराधीन आहे जगती, शतजन्म शोधिताना ही गीते आणि अफजलखान वधाचा पोवाडा तसेच सुंदरा मनामध्ये भरली, माझी मैना गावाकडे राहिली अशा लावण्या, म्यानातून उसळे तलवारीची पात… अशा अनेकानेक रचना सादर झाल्या. ‘
सर्वात्मका सर्वेश्र्वरा’ या कुसुमाग्रजांच्या रचनेने या रंगतदार कार्यक्रमाची सांगता झाली. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले.