गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ड्रास्टिक क्रिएशनच्या ‘वाटसरू’ला भरत करंडक !
स. प. महाविद्यालयाची ‘कृष्णपक्ष’ द्वितीय तर सपान, नाशिकच्या ‘विल्कू’ला तृतीय पारितोषिक !!
पुणे : भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेत ड्रास्टिक क्रिएशनने सादर केलेल्या ‘वाटसरू’ एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. संघास सात हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. स. प. महाविद्यालयाच्या ‘कृष्णपक्ष’ एकांकिकेस सांघिक द्वितीय तर सपान, नाशिकच्या ‘विल्कू’ एकांकिकेस सांघिक तृतीय क्रमांक मिळाला.
या संघांना अनुक्रमे पाच हजार आणि तीन हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह तर मुक्ताई फौंडेशनच्या ‘स्किम’ आणि विहंग कलामंडळाच्या ‘फोबिया’ एकांकिकेस सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेत 27 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे यंदाचे 17वे वर्ष आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिर नृत्य-नाट्य-संगीत कलाप्रवासाची 129 वर्षे विजयादशमीला पूर्ण करीत आहे. या निमित्त संस्थेचा वर्धापन दिन, विविध पुरस्कार विजेत्यांचा सत्कार आणि भरत करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 23) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक पंडित डॉ. विकास कशाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत करंडक एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणारा ड्रास्टिक क्रिएशनचा संघ. समवेत राहुल सोलापूरकर, पंडित डॉ. विकास कशाळकर, पांडुरंग मुखडे, रवींद्र खरे, प्रदीप रत्नपारखी, अभय जबडे आदी.
सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, विश्वस्त रवींद्र खरे, प्रदीप रत्नपारखी तसेच शंतनू खुर्जेकर व्यासपीठावर होते. गणेश इनामदार, प्रियांका गोगटे, मधुर डोलारे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.
संस्थेच्या वतीने कै. गो. रा. जोशी स्मरणार्थ नाट्यसमीक्षक/अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेशचंद्र पाध्ये, कै. अवधूत घाटे स्मरणार्थ संस्था नाट्यकलाकार पुरस्कार अभय जबडे, उत्कृष्ट संगीत वादक पुरस्कार हिमांशू जोशी, गुणवंत संस्था कलाकार पुरस्कार अपर्णा पेंडसे, संस्था कलाकार (नियोजन) पुरस्कार सतीश सकिनाल, सर्वोकृष्ट बालकलाकार पुरस्कार ज्ञानांश कुलकर्णी, उत्कृष्ट नाट्य कलाकार पुरस्कार राजेंद्र उत्तुरकर यांना या प्रसंगी प्रदान करण्यात आला.
पडद्यामागील कलाकरांचे पाल्य आराध्या प्रदीप निकम आणि आयुष संदीप आफळे यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान तर सेवालय (हासेगाव, लातूर) आणि अनुग्रह फौन्डेशन या सामाजिक सेवाभावी संस्थांना प्रत्येकी 21 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
भरत नाट्य मंदिराशी तब्बल 51 वर्षांपेक्षा जास्त काळापासून जोडला गेलो आहे असा गौरवाने उल्लेख करून प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले, जागतिक पातळीवर मी अनेक ठिकाणी अभिनय केला आहे, परंतु भरत नाट्य रंगमंचावरील जीवंतपणा कुठेही पाहिला नाही.
भरत नाट्य मंदिराने परिवर्तनाचा स्वीकार करून सर्व सोईनी सुसज्ज असे भव्य नाट्यसंकूल उभारावे अशी रंगभूमीचा सेवक म्हणून आग्रही विनंतीही त्यांनी केली.पंडित विकास कशाळकर म्हणाले, संस्था 130व्या वर्षात पदार्पण करत आहे ही भाग्याची गोष्ट आहे. ही जगातील एक मोठी संस्था आहे आणि या संस्थेची धुरा पदाधिकारी उत्तमरित्या सांभाळत आहेत.
संस्था जागतिक स्तरापर्यंत पोहोचावी यासाठी संस्थेने प्रयत्न करावेत.सत्काराला उत्तर देताना सुरेशचंद्र पाध्ये म्हणाले, भरत नाट्य मंदिराने अनेक उत्तम रंगकर्मी घडविले आहेत. व्यावसायिकतेच्या पलिकडे जाऊन काम करणारे माध्यम म्हणजे रंगभूमी होय. हे क्षेत्र सर्व गोष्टींचे आयाम बदलू शकते. हे संस्कृतीचे पाईक आहेत.
भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित कार्यक्रमात विविध पुरस्काराने सन्मानित मान्यवर.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील नृत्य विभागातील विद्यार्थिनी वृंदा पांगारकर आणि पूर्वा वैद्य यांच्या कथक नृत्यप्रस्तुतीने झाली. प्रास्ताविकात रवींद्र खरे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन अभय जबडे, रवींद्र खरे, डॉ. प्रचिती सुरू, अविनाश ओगले यांनी केले. स्पर्धेचे संयोजन संजय डोळे आणि विश्वास पांगारकर यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
लेखन : प्रथम शिरीन बर्वे, श्रीनिधी झाड (कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय), द्वितीय विवेक पगारे (अमृतफळे, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट, बावधन), उत्तेजनार्थ प्रणव जगताप (विळखा, अभि. महा. एकल महाराष्ट्रीय तंत्रज्ञान).
दिग्दर्शन : प्रथम शिरीन बर्वे, श्रीनिधी झाड (कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय), द्वितीय आकाश सुतार (वाटसरू, ड्रास्टिक क्रिएशन), उत्तेजनार्थ प्रणव सपकाळे (विल्कू, सपान, नाशिक).
अभिनय : पुरुष : प्रथम मिहिर माईणकर (रघुनाथ, विळखा, अभि. महा. एकल महाराष्ट्रीय तंत्रज्ञान), द्वितीय श्री पगारे (मधुकर देशपांडे, अमृतफळे, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी).
लक्षवेधी अभिनय शुभम शिंदे (शंकू, काजवा, पुणे विद्यार्थी गृह).
अभिनय : स्त्री : प्रथम ऋतुजा आगाशे (बाई, वाटसरू, ड्रास्टिक क्रिएशन), द्वितीय शिरीन बर्वे (वृंदा, कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय).
नेपथ्य : प्रथम सारंग पाटील, शुभम निकम (वाटसरू, ड्रास्टिक क्रिएशन), द्वितीय कृष्णा कळसपूरकर, क्षौनिक बोरकर (पत्त्यांचा बंगला, पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय).
प्रकाश योजना : प्रथम धीरज लोंढे, सोहम शिंदे (वाटसरू, ड्रास्टिक क्रिएशन), द्वितीय हर्षल कांबळे, प्रणव सपकाळे (विळखा, अभि. महा. एकल महाराष्ट्रीय तंत्रज्ञान).
ध्वनीसंयोजन : प्रथम रोहन मेघावत (कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय), द्वितीय अथर्व कुलकर्णी (काजवा, पुणे विद्यार्थी गृह).सर्वोत्कृष्ट प्रेक्षक सहभाग : पुणे विद्यार्थी गृह संघ.लक्षणीय अभिनय : विष्णुदास महाजन (नाट्यहोलिक)
जाहिरात