गोल्डन आय न्यूज नेटवर्क
लहान-थोरांनी घेतला पपेट शोचा आनंद !
तैवानच्या कलकारांनी खेळातून उलगडली अनोखी अख्यायिका
आयसीसीआरतर्फे पुण्यात प्रथमच आयोजन !
पुणे : नायक आणि नायिकेच्या उत्कट प्रेमाचे बंध जुळून येत असतानाच दोन तोंडाच्या ड्रॅगनने केलेला हल्ला, हल्ला परतवून लावत मिळविलेली विजयश्री अशी ही आख्याखिका उलगडली ती तैवानच्या पपेट शोमधून. बालकांसाह उपस्थितांनी या खेळाचा आनंद घेत अनोख्या बाहुल्याही हाताळल्या.
निमित्त होते ते केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालय आणि सिंबायोसिस इन्टरनॅशनल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) आयोजित करण्यात आलेल्या तैवानच्या पपेट शोचे. चन युन लिन क या तैवानमधील प्रसिद्ध पपेट थिएटरच्या कलाकारांनी हा अनोखा आविष्कार पुणेकरांसमोर सादर केला.
पुण्यातील पहिला तर भारतातील हा दुसरा प्रयोग होता.
पुण्याचे विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जुन देवरे, सिम्बायोसिस विश्व विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संबंध परिषदेच्या प्रमुख रुपाली चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार यांनी उपस्थितांचे आणि कलाकारांचे स्वागत केले.
ली चिंगये, वांग, शिऔयुन, यु युचिया, लिऊ वानयी, वांग त्सुइफिंग, हुआंग, वैयु, त्साय मिंगहाओ, लियु मिंगइ या कलाकारांनी पपेट शो सादर केला. भारतातील कठपुतळीच्या खेळाशी या खेळाचे साधर्म्य आहे. हाताच्या पाचही बोटांनी या बाहुल्या खेळविल्या जातात.
कलाकारांनी दोन तोंडाच्या राक्षसाची अख्यायिका सादर केली. एका गावातील आजोबा आणि नातीच्या नात्यातून ही कथा सुरू झाली.
तैवानच्या कलाकरांसह पपेट शोमध्ये सहभागी झालेली पुणेकर बच्चेकंपनी.
त्यातूनच नायक-नायिकेची कथा उलगडत गेली. आजोबांची मजा करणारी खुर्ची, गावातील जत्रा, तिथे रंगणारे विविध खेळ, आजोबा आणि नातीची धमाल सुरू असतानाच कहाणीत नायकाचा झालेला प्रवेश, नायक आणि खलनायकातील तुंबळ युद्धात जिंकलेले प्रेम अशी ही गोष्ट. एखाद्या परिकथेची आठवण करून देणारा हा तैवानी कठपुतळीचा खेळ उपस्थितांना निखळ आनंद देऊन गेला.
डॉ. अर्जुन देवरे म्हणाले, अनोख्या कलांच्या माध्यमातून देश-विदेशातील लोकांना एकमेकांच्या समृद्ध संस्कृतीची ओळख होते.
प्रास्ताविकात राज कुमार यांनी आयसीसीआरच्या उपक्रमांची माहिती दिली.
तैवानच्या प्रसिद्ध कलकारांचा खेळ पुणेकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे, तो निश्चितच पुणेकरांच्या पसंतीस उतरेल. कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी यांनी तर सूत्रसंचालन अनुप्रिता लेले यांनी केले.
जाहिरात