गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भजन-आरत्यांमधून घडले जगत्नियंत्याचे सगुण साकार दर्शन !
वै. मनोहरपंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त ‘काकड आरती ते शेजारती’ कार्यक्रम .!!
पुणे : निर्गुण निराकार वैश्विक शक्तीला आळविताना भजन आणि आरतीच्या माध्यमातून जगत्नियंत्याचे सगुण साकार स्वरूपात दर्शन घडले ते ‘काकड आरती ते शेजारती’ या भक्तीरसपूर्ण अनोख्या कार्यक्रमात.
सामूहिक भजन अध्यापनाचा आदर्श असणारे भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज (दि. 21) प्रारंभ झाला. या निमित्त संगीत भजन मंदिर परिवारातर्फे सुदर्शन रंगमंच येथे ‘काकड आरती ते शेजारती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच वै. दादा सबनीस यांनी सुरू केलेली संगीत भजन मंदिर परिवार ही संस्था या वर्षी 75व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचा योगही या निमित्ताने जुळून आला.कार्यक्रमाची सुरुवात ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर करून झाली. ‘उठा उठा हो सकळीक’ तसेच ‘उठा पांडुरंगा आता दर्शना’ या काकड आरतीच्या रचनांनंतर मुख प्रक्षाळणासाठी ‘तु खाय बा साखर-लोणी’ ही रचना सादर करण्यात आली.
भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या जन्मशताब्दीवर्ष प्रारंभानिमित्त संगीत भजन मंदिर परिवारातर्फे ‘काकडआरती ते शेजारती’ कार्यक्रम सादर करताना कलाकार.
‘विठुराज उठा आता स्नाय कराया’ या आरतीने भगवंतांनी स्नान करावे यासाठी तसेच भगवंतांना भोजनासाठी, विडा सेवनासाठी, श्रीहरीने केलेला श्रृंगार पाहण्यासाठी आळवणी करताना ‘सख्या हरि जेवी बा सगुणा’, ‘विडा घ्या हो नारायणा’, ‘हरिला दावा तुम्ही आरसा’ या तर ‘मम हृदयीचा झोपाळा’, ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची’, ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ ‘द्वारकापती बसले अयोध्यापती’ या आरत्यांद्वारे दुपारची विश्रांती, संध्याकाळची प्रदक्षिणा तर रात्रीच्या विसाव्यासाठी रचलेल्या आरत्याही सादर करण्यात आल्या.
कार्यक्रमाची सांगता वै. दादा सबनीस यांच्या आवाजातील ध्वनीमुद्रित पसायदान ऐकवून झाली. कार्यक्रमास उपस्थित श्रोत्यांनी ताल धरत टाळ्यांच्या गजरात साथ केली अन् भक्तीरसाची उत्कट अनुभूती घेतली.पहाटेच्या काकडआरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत भगवंताच्या सेवेच्या वेगवेगळ्या माध्यमांचे दर्शन आरत्यांच्या पारंपरिक गीतांमधून व्यक्त होते.
याच गीतांवरील अभ्यासपूर्ण कार्यक्रमाचे लेखन वै. दादा सबनीस यांनी सुमारे 45 वर्षांपूवी केले आहे. या कार्यक्रमाची पुननिर्मिती त्यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने करून त्यांना आदरांजली वाहणे हा ‘काकड आरती ते शेजारती’ या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे मिलिंद सबनीस यांनी प्रास्ताविकात सांगितले. येत्या वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संहिता लेखन आणि संगीत वै. मनोहरपंत सबनीस यांचे होते. हिमानी नांदे, मंजिरी काळे, प्रणव काळे, ज्ञानदा काळे, आशिष काणे, तृप्ती पेंडसे यांचा सहभाग असून अविनाश तिकोनकर (पखवाज), मिलिंद पाटणकर (तबला), अंजली जोशी (व्हायोलिन), मिलिंद सबनीस (संवादिनी) यांनी साथसंगत केली तर कार्यक्रमाचे निवेदन सावनी केळकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
सौमित्र सबनीस, विजय केळकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात वै. दादा सबनीस यांच्या पंडितराव करंदीकर, भालचंद्र बुचके, नंदिनी लिमये, अलका गोगट या ज्येष्ठ शिष्यगणांनी तसेच यशवंत चंद्रचूड यांनी आठवणींना उजाळा दिला.
जाहिरात