गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भजनाचार्य मनोहरपंत सबनीस जन्मशताब्दीवर्ष प्रारंभानिमित्त
संगीत भजन मंदिर परिवारातर्फे शनिवारी ‘काकडआरती ते शेजारती’ विशेष कार्यक्रम !!
पुणे : भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या जन्मशताब्दीवर्ष प्रारंभानिमित्त संगीत भजन मंदिर परिवारातर्फे येत्या शनिवारी (दि. 21) ‘काकडआरती ते शेजारती’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संगीत भजन मंदिर परिवाराचे मिलिंद सबनीस यांनी निवेदनाद्वारे दिली.
सामूहिक भजन अध्यापनाचा आदर्श असणारे भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होत आहे. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता सुदर्शन सभागृह, अहिल्यादेवी प्रशालेच्या मागे, शनिवार पेठ येथे होणार आहे. कार्यक्रमास श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा या संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. रामचंद्रबुवा भिडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
वै. दादा सबनीय यांचा जन्म भजनी परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांनी 1949मध्ये स्त्रियांसाठी भजन अध्यापनास सुरुवात केली. महिलांबरोबर घरातील कर्ती मंडळीही भजनाला येऊ लागली. त्यांनी भजनात अनेक प्रयोग केले. 1968 मध्ये ‘माझे माहेर पंढरी’ हा सव्वाशे कलावंतांना घेऊन केलेला दिंडीचा कार्यक्रम विशेष गाजला.
संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील ‘धन्य ती आळंदी’, ‘तुका सांगतो कथा’ या संगीतमय कार्यक्रमांबरोबर हरिपाठातल्या 28 अभंगांना वेगवेगळ्या रागांमध्ये, विविध तालांमध्ये त्यानी बांधलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. ‘संगीत भजन मंदिर’ या संपूर्णपणे भजनाला वाहिलेल्या या आपल्या संस्थेतून त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले.
पहाटेच्या काकडआरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत भगवंताच्या सेवेच्या वेगवेगळ्या माध्यमांचे दर्शन आरत्यांच्या पारंपरिक गीतांमधून व्यक्त होते. याच गीतांवरील अभ्यासपूर्ण कार्यक्रमाचे लेखन वै. दादा सबनीस यांनी सुमारे 45 वर्षांपूवी केले आहे. या कार्यक्रमाची पुननिर्मिती त्यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने करून त्यांना आदरांजली वाहणे हा ‘काकड आरती ते शेजारती’ या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
संहिता लेखन आणि संगीत वै. मनोहरपंत सबनीस यांचे आहे. हिमानी नांदे, मंजिरी काळे, प्रणव काळे, ज्ञानदा काळे, आशिष काणे, तृप्ती पेंडसे यांचा सहभाग असून अविनाश तिकोनकर (पखवाज), मिलिंद पाटणकर (तबला), अंजली जोशी (व्हायोलिन), मिलिंद सबनीस (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन सावनी केळकर आणि प्रसाद कुलकर्णी करणार असून सौमित्र सबनीस, विजय केळकर तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात पंचपदी भजनाने होणार असून त्यानंतर ‘काकड आरती ते शेजारती’ हा कार्यक्रम होणार आहे.
जाहिरात