गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘मेघदूत’चा काव्यानुवाद वाचनीय आणि भावपूर्ण : पंडित वसंतराव गाडगीळ !
डॉ. ज्योती रहाळकर लिखित ‘मेघदूत एक काव्यानुवाद’ पुस्तकाचे प्रकाशन !
पुणे : महाकवी कालिदास यांनी ‘मेघदूत’ या महाकाव्याद्वारे आदर्श जीवनपद्धतीची मूल्ये विशद केलेली आहेत. त्या मूल्यांचे आचरण केले नाही तर जीवन शुष्क होईल, असे प्रतिपादन संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी केले. निसर्गाशी संवाद साधण्याचे सामर्थ्य ‘मेघदूत’ या काव्यातून अनुभवायला मिळते, असेही ते म्हणाले.
सिग्नेट पब्लिकेशन्सतर्फे प्रसिद्ध कवयित्री डॉ. ज्योती रहाळकर लिखित ‘मेघदूत एक काव्यानुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन पंडित गाडगीळ यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. सिग्नेट पब्लिकेशन्सचे संचालक ॲड. प्रमोद आडकर, डॉ. जयेश रहाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेघदूत एक काव्यानुवाद’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, डॉ. ज्योती रहाळकर, पंडित वसंतराव गाडगीळ, डॉ. जयेश रहाळकर.
पंडित गाडगीळ पुढे म्हणाले, महाकवी कालिदासांनी ‘मेघदूत’ या महाकाव्यात भौगोलिक परिस्थितीबरोबरच रुढी-परंपरा, नद्या, वनस्पती, डोंगर याचे कलेले वर्णन आजही बघता येऊ शकते. संस्कृत भाषेतील या महाकाव्याचा डॉ. ज्योती रहाळकर यांनी सरळ सोप्या मराठी भाषेत केलेला अनुवाद सर्वार्थाने वाचनिय आणि भावपूर्ण आहे.
रामायण, महाभारत आणि मेघदूत आपली जीवनसंस्कृती दर्शविणारे असल्याने आयुष्यासाठी ते मार्गदर्शक ग्रंथ आहेत.डॉ. ज्योती रहाळकर म्हणाल्या, ‘मेघदूत’ हे मुळात विरहकाव्य आहे. आपण कुशल आहोत हे सांगण्यासाठी महाकाव्यातील नायक ढगाची निवड करतो, कारण तोच कुशलतेचा संदेश जलद गतीने नायिकेला सांगू शकतो, अशी कल्पना करण्यात आली आहे. हे वर्णन अनुवादातून मांडले आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत ज्योती रहाळकर आणि डॉ. जयेश रहाळकर यांनी केले. सूत्रसंचालन अरुजा रहाळकर यांनी तर आभार डॉ. जयेश रहाळकर यांनी मानले.
जाहिरात