गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वाचन संस्कृती रुजवण्यात गणेश मंडळांचे मोलाचे योगदान : रमेश परदेशी !
समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांचा सरहद, पुणेतर्फे कृतज्ञता सन्मान.!
पुणे : पुण्यातील गणेश मंडळांचे कार्य केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नाही. विधायक कार्यामुळे पुण्यातील गणेश मंडळांची ख्याती महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. वाचन संस्कृती टिकावी, वाढावी यासाठी मंडळे सातत्याने प्रयत्नशील असतात, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी यांनी काढले.
पुस्तक हंडी, वाचनालये, पुस्तक भिशी, पुस्तकांचा महानैवेद्य असे समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या पुण्यातील 35 गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी परदेशी बोलत होते. दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कृतज्ञता सन्मान सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतद वानखेडे, लेखक व उद्योजक शरद तांदळे, सरहद, पुणेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, वैभव वाघ, पियूष शहा, मयूर मसुरकर, शिरीष मोहीते व्यासपीठावर होते.
गणेश मंडळातील कार्यकर्ते हे समाजाचा आरसा आहेत असे सांगून रमेश परदेशी म्हणाले, कुठे काही समस्या उद्भवली की आधी गणेश मंडळांचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून जातात हे मी स्वत: पाहिले आहे.
सरहद, पुणेच्या कार्याची माहिती सांगून शैलेश वाडेकर म्हणाले, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मंडळांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या साहित्य संमेलनानिमित्त अनेक साहित्यिक, सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
संमेलनास मिळालेला प्रतिसाद पाहता हे संमेलन सर्वसामान्यांचा आवाज झाला आहे. संमेलन चार दिवसांचा सोहळा न राहता संमेलनातून काही तरी निष्पत्ती व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत.
गणेश मंडळांच्या कार्याची माहिती सांगताना पियूष शहा म्हणाले, गणेशोत्सवापुरते गणेश मंडळांचे कार्य सिमित नाही. पुण्यातील अनेक मंडळे वर्षभर सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी झटत असतात. कोरोना काळात मंडळांचे कार्यकर्ते सर्वप्रथम समाजाच्या मदतीसाठी धावून आल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत वानखेडे म्हणाले, गणेश मंडळांच्या विधायक कार्यावरून त्यांची ताकद किती मोठी आहे, हे समजून येते. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, हे दिसून येते. शरद तांदळे म्हणाले, गणेश मंडळांचे कार्यकर्ते समाजासाठी मोलाची भूमिका बजावत असतात.
वैभव वाघ प्रास्ताविकात म्हणाले, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे संस्थात्मक काम एकत्र आले तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीत आयोजित करण्यात आलेले साहित्य संमेलन होय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन मयूर मसुरकर यांनी केले.