गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सदाबहार गीतांना रसिकांची दाद !!
सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित रंगली ‘संगीत सरि ता’ मैफल !
पुणे : ‘संगीत सरिता’ या अनोख्या मराठी-हिंदी गीतांच्या बहारदार सादरीकरणातून रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली. निमित्त होते सहकारनगरमधील सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टने आयोजित केलेल्या मैफलीचे. गायक-वादकांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद देत रसिकांनीही मैफलीत अनोखे रंग भरले.
प्रसिद्ध गायक पंडित राजेश दातार यांच्या संकल्पनेतून या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट, सहकारनगर क्रमांक दोनमधील मंडळाशेजारील भव्य पटांगणात आयोजित मैफलीस रसिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अश्विनी जेधे आणि मोहिनी जाधव यांनी भरतनाट्यमद्वारे गणेशवंदनेने केली.
‘संगीत सरिता’ मैफलीत सहभागी प्रज्ञा देशपांडे, पंडित राजेश दातार आणि मनिष गोखले.
सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मंडळाने यंदा अध्यात्म आणि वारकरी संप्रदाय याचे नाते जोडणारा; विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घडविणारा भव्य अन् सुंदर असा देखावा साकारला आहे. सुबक आरास त्यात विठ्ठल-रखुमाई त्याचप्रमाणे श्री गणेशाची सुंदर मूर्ती अन् पंडित राजेश दातार यांनी ‘माझे माहेर पंढरी’ रचनेने मैफलीची केलेली सुरुवात वातावरणात चैतन्यदायी करणारी ठरली.
‘प्रथम तुज पाहता’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘या जन्मावर या’, ‘जीवलगा कधी रे’, ‘असा बेभान हा वारा’, ‘रेशमाच्या रेघांनी..’, ‘दूर व्हा जाऊ द्या’, तसेच ‘ओ मेरी जोहरा जबी’, ‘ओ सजना’, ‘मधुबन मे राधिका..’ यासह सादर करण्यात आलेल्या गीतांना रसिकांनी टाळ्या अन् वन्स मोअरच्या गजरात दाद दिली.
पंडित राजेश दातार यांच्यासह प्रज्ञा देशपांडे, निवेदिता साहा, शीतल म्हसतकर यांनी गीते सादर केली. केवळ वादक कलाकारांनी सादर केलेल्या ‘पर्दा ये मुहब्बतवाला’ या गीताला भरभरून दाद दिली. डॉ. नरेंद्र चिपळूणकर (हार्मोनियम), विनीत तिकोनकर (तबला), स्वयम सोनवणे (रिदम), अमन सय्यद (की-बोर्ड) यांनी दमदार साथ केली तर गीते आणि त्याची पार्श्वभूमी तसेच कलाकारांच्या आठवणी सांगत मनीष गोखले यांनी निवेदन केले.
कलाकारांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष मदन कटारिया, विनय कुलकर्णी, पंडित अतुलकुमार उपाध्ये, शंतनू शर्मा, विजय ममदापूरकर, अमित कुलकर्णी यांनी केले
————————————————————————
जाहिरात
.