गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मूर्खांच्या बोलण्याने सनातन संस्कृती नष्ट होणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!
सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळाच्या कार्याचा गौरव !!
पुणे : जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीबद्दल सन्मान वाढतो आहे; परंतु आपल्याच देशातील काही मूर्ख लोक आपल्या संस्कृतीबद्दल वेड्यासारखे बोलतात. आपली भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, सनातन संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. हजारो आक्रमणे झाली तरी आपली संस्कृती नष्ट होऊ शकली नाही.
कुणाच्याच बोलण्याने या सनातन संस्कृतीवर काहीही परिणाम होणार नाही,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सहजीवन मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष आहे, हे सिंहावलोकन करण्याचे वर्ष असल्याचे नमूद करून त्यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव केला.
सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट येथे श्री गणेशाची पूजा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माधुरी मिसाळ, मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील व इतर पदाधिकारी.
सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट येथे श्री गणेशाची पूजा आज (दि. 21) सायंकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाली, त्या वेळी त्यांनी गणेशभक्तांशी संवाद साधला. आमदार माधुरी मिसाळ, भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदिश मुळीक, प्रसेनजित फडणवीस, विनय कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, मदन कटारिया, राजेश दातार, अमित कुलकर्णी, महेश वाबळे आदी उपस्थित होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची महती सांगून फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीचा सर्वात मोठा भाग म्हणजे सण-उत्सव आहेत. सण आणि उत्सव हे केवळ साजरे करण्याकरिता नसतात तर त्यातून काही सामाजिक संदेश दिला जातो; हाच मथितार्थ सण आणि उत्सवांचा आहे.
संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेषत: पुण्यातील गणेशोत्सवाला सांस्कृतिक महत्त्व आहे. विविध मंडळे आपल्या संकल्पनेतून-कल्पकतेतून समाजाला सतत नवीन काही तरी देण्याचा प्रयत्न करतात. यातूनच अनेक कार्यकर्ते निर्माण होतात. समाजात एकत्रितपणे वावरण्याची पद्धती तयार होते, युवक-युवतींना आयोजनाविषयीचे मार्गदर्शन घडते.
सामाजिक अभिसरणासाठी गणेशोत्सवापेक्षा दुसरा सण असू शकत नाही.आमदार माधुरी मिसाळ यांनी मंडळाला दिलेल्या देणगीचा धनादेश देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील आणि विनय कुलकर्णी यांनी स्वीकारला.
सुरुवातीस मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला. देवेंद्र फडणवीस आणि माधुरी मिसाळ यांचे स्वागत नितीन पाटील, विनय कुलकर्णी यांनी तर जगदिश मुळीक यांचे स्वागत मदन कटारिया यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे आणि ऋतुजा फुलकर यांनी केले. आभार नितीन पाटील यांनी मानले.
जाहिरात