गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मोबाईल आधी मुलांना रामकृष्णहरी कळले पाहिजे..
सरहद पब्लिक स्कूल आयोजित ‘सोहळा आजी आजोबांचा’
पुणे : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, ‘प्लॅस्टीकचा वापर करू नका’, ‘घरचा ओला कचरा घरातच जीरवा’ असे संदेश देत मोबाईच्या आधी मुलांना ‘रामकृष्णहरी’ कळले पाहिजे अशी अपेक्षा सरहद पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित ‘सोहळा आजी आजोबांचा’ या अभिनव कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी व्यक्त केली.
पारंपरिक वेषभूषेत सहभागी होऊन रेड कार्पेटवर कॅटवॉक करताना आजी-आजोबा.
दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने धनकवडीतील सरहद पब्लिक स्कूल येथे आज (दि. 31) आजी-आजोबांचा स्नेहमेळा मोठ्या उत्साहात रंगला. ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, सौ. गोडबोले, सुरेश मेहता, सरोज मेहता, मनोहर कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरहदच्या सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, विश्वस्त अनुज नहार, गुजरवाडी येथील सरहद शाळेच्या पर्यवेक्षिका मनिषा वाडेकर, मुख्याध्यापिका सुजाता गोळे, लेखापाल विभाग प्रमुख गीता खोत, समन्वयक झाहिद भट उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यांनतर शाळेतील शिक्षकांनी ‘हे मराठी बाहू झुंजते राहू’ हे संमेलन गीत सादर केले.
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सरहद संस्था करीत असल्याच्या निमित्ताने मराठी भाषा मुलांमध्ये रुजावी, भाषेचे संवर्धन व्हावे, मराठी भाषा पुढील पिढ्यांकडे प्रवाहित व्हावी या करिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजी-आजोबांसाठी पारंपरिक वेशभूषा, महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती दर्शविणारी पाककला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, काव्यवाचन, कथाकथन, असे उपक्रम राबविण्यात आले.
विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत आजी-आजोबांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून रेड कार्पेटवर कॅटवॉक करण्याचा अनोखा आनंदही आजी-आजोबांनी लुटला. पाककला स्पर्धेत विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मराठवाड्यातील खाद्यपदार्थांची ओळख या निमित्ताने झाली.
सरहद शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी उपस्थित आजी-आजोबांसाठी मराठीतील सुप्रसिद्ध गीतांवर नृत्य सादरीकरण करून मोहित केले.
सरहद संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन अविनाश गोडबोले म्हणाले, आज शिक्षणाच्या क्षेत्रात बाजार झालेला आहे. अशा परिस्थितीत सरहद संस्थेतर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केले जाणारे कार्य स्पृहणीय आहे.
सुरेश मेहता म्हणाले, हा समारंभ अतिशय हृद्य झाला आहे. सरहदच्या माध्यमातून नहार व वाडेकर कुटुंबिय देशातील अनेक नातवंडांचे आजी-आजोबापण निभावत आहेत. सरहद शाळा म्हणजे सरस्वतीचे-शिक्षणाचे पवित्र मंदिरच आहे.
मनोहर कोलते म्हणाले, असे उपक्रम प्रत्येक शाळेत झाले पाहिजेत. आजी-आजोबा ज्या घरात असतात तेे घर मंदिर असते. एकत्र कुटुंबाची संस्कृती उपयुक्त असून आजी-आजोबांकडून मिळणारा आनंद, संस्कार महत्त्वाचे असतात. आजी-आजोबा स्नेहाचे, प्रेमाचे संस्कार करून नातवंडांकडे कुटुंबव्यवस्थेचे बाळकडू पोहोचवत आहेत.
सरहद संस्थेच्या कार्याचे आणि शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमाचे अनेक आजी-आजोबांनी मनोगतातून कौतुक केले.