गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुण्यात घडला काश्मीर आणि महाराष्ट्राच्या कलांचा संगम !
‘अजमते-ए-काश्मीर’ काश्मीर महोत्सवाला पुणेकरांची भरभरून दाद !!
पुणे : काश्मिर आणि महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचा अनोखा मिलाफ आज पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते ‘अजमते-ए-काश्मीर’ या 13व्या काश्मीर महोत्सवाचे. सरहद, पुणे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.तर्फे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास तीन तासांपेक्षा अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमात रसिकांनी काश्मिरी वाद्यांवर ठेका धरला.
काश्मिरी आणि मराठी गायन तसेच भजनासाठी प्रसिद्ध असलेल्या शमिमा अख्तर या महोत्सवाच्या मुख्य आकर्षण ठरल्या. आलमदार भगत थिएटर तसेच मजहर सिद्दीकी, शमिमा अख्तर आणि रोहित ठाकूर यांच्या सरहद म्युझिकच्या कलाकारांचा सहभाग होता. पारंपरिक काश्मिरी लोककला, लोकगीते, लोकनृत्य आणि लोकनाट्य यांच्या अनोख्या सादरीकरणातून सांस्कृतिक काश्मीरची परंपरा अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.चे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. संजीवकुमार शर्मा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.चे मुख्य अभियंता अनिल कोळप आणि सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, मानव संधान विभागचे संचालक सुगध गमरे, महावितरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय कुऱ्हाडे, महावितरण नाशिकचे मुख्य अभियंता संजीव भोळे, कराडच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता नासिर काद्री, आपीएस अधिकारी कैलास कणसे, टाटा इलेक्ट्रीकचे उपाध्यक्ष देसले, व्हिजिलन्स ॲण्ड सिक्युरिटीच्या निशा बंडगर आदी उपस्थित होते. काश्मिरी कलाकारांचा सत्कार पुणेरी पगडी, उपरणे देऊन करण्यात आला.
काश्मिरी शहनाई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. काश्मिरी कलाकारांनी शहनाई आणि ढोलकचा प्रभावीपणे वापर करत पारपंरिक रचनांसह ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीत वाजवले.
महाराष्ट्रातील पारंपरिक गीतांवर सरहद शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. सांस्कृतिक कलेचा वारसा जपत कलाकारांनी काश्मिरी नाटिका, पारंपरिक काश्मिरी गीते, नृत्य, रौफ, संतूर, रबाब, ठुमर नारी आदी वाद्यांचे सादरीकरण केले. काश्मिरी आणि मराठी गायन तसेच भजनासाठी प्रसिद्ध असलेल्या शमिमा अख्तर या महोत्सवाच्या मुख्य आकर्षण ठरल्या पारंपरिक काश्मिरी गीते, बॉलिवूड हिट्स यांसह रसिकांच्या खास आग्रहास्तव शमिमा यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग सादर करून विठ्ठल नामाचा गजर करत रसिकांची मने जिंकली.
इंग्रजांचे भारतावर अतिक्रमण होत असताना काश्मिरी नागरिकांनी त्यांच्या राजवटीला विरोध करत तेथील समृद्ध जंगलांचा वारसा जपून ठेवला या विषयी काश्मिरी भाषेतील नाटिकेचे शब्द जरी समजले नसले त्यांचा आशय ओळखून कला भाषेच्या सगळ्या सीमारेषा पार करत काळजात घर करते यांचा अनुभव आज रसिकांना आला.
काश्मिर आणि महाराष्ट्राची नृत्य-गायन संस्कृती यांची जुगलबंदी कार्यक्रमाचे आकर्षणबिंदू ठरली. सरहद शाळेतील विद्यार्थ्यींनी सादर केलेला हा सुंदर नृत्य मिलाफ रसिकांचे मने जिंकून गेला.
कार्यक्रमाची सांगता भांड पथकाच्या सादरीकरणाने झाली. गीत सादर करत अनोखा, झगमगता घागरा घालून काश्मिरी नृत्य सादरीकरण झाले. पारंपरिक काश्मिरी वाद्य-नृत्य यांनी रसिकांची मने जिंकली. पुणेकर रसिकांनी या काश्मिरी महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांची मोरे आणि श्वेता जाधव यांनी केले.