गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शिक्षणसंस्थांना बाजारी रूप : ह.भ.प. माणिकबुवा मोरे
पवित्र अंत:करणाने विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांसमोर समाज नतमस्तक.!
वृंदावन फाउंडेशनतर्फे उपक्रमशील शिक्षकांचा कर्तव्यपत्र देऊन गौरव!!
पुणे : शिक्षण संस्थांमध्ये स्पर्धा वाढल्या असून शिक्षकी व्यवसाय आणि संस्थांना बाजारी रूप आले आहे. याला राजकीय व्यवस्था जशी जबाबदार आहे त्याचप्रमाणे समाजही जबाबदार आहे. अशाही परिस्थितीत पवित्र अंत:करणाने काही शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे प्रयत्न करीत आहेत.
अशा शिक्षकांसमोर समाज नतमस्तक होतो, अशा भावना जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि संत चोखामेळा साहित्य संमेलानाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज यांनी व्यक्त केल्या.वृंदावन फाउंडेशनतर्फे 18वा गुरुजन गौरव सोहळा भारतीय विचार साधना सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
वृंदावन फाउंडेशन आयोजित गुरुजन गौरव सोहळ्यात उपक्रमशील शिक्षकांसमवेत माणिकबुवा मोरे, डॉ. डी. एम. मोरे, शिवाजीराव मोरे, सचिन पाटील, प्रा. अप्पासाहेब पुजारी आदी.
त्या वेळी अध्यक्षपदावरून मोरे महाराज बोलत होते. प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, डॉ. संदीप सांगळे, डॉ. शितल मोरे, प्रज्ञा कुलकर्णी, गजेंद्र गायकवाड, ए. डी. राऊत, दीपक कांदळकर, भारत सातपुते, शैलेश स्वामी, पुष्पलता पांढरे या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कर्तव्यपत्र, माता रमाई यांचे चरित्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सन्मान पाटबंधारे विभागातील माजी प्रधान सचिव डॉ. डी. एम. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक सचिन पाटील, ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज, संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. अप्पासाहेब पुजारी, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज व्यासपीठावर होते.
डॉ. डी. एम. मोरे म्हणाले, प्रामाणिकपणा जपला तर आयुष्य सुखासमाधानाने जगता येते. कर्तृत्ववान शिक्षकांच्या सन्मानाच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगुलपणा पेरण्याचे काम होत आहे. शिक्षण क्षेत्रात अनाचाराने परिसिमा गाठली आहे, अशा परिस्थितीत तत्त्वनिष्ठ लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वतीने भारत सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण क्षेत्र सर्वात दुर्लक्षित क्षेत्र असल्याचे ते म्हणाले. सचिन पाटील यांनी प्रास्ताविकात पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्दिष्ट विशद केले. मान्यवरांचे स्वागत प्रा. माणिकराव सोनवणे, सचिन पाटील, सिद्धेश्वर माने, अविनाश अभंगराव, आशिष यादव, प्रसाद माने महाराज, नितीन कवठेकर यांनी केले. कर्तव्यपत्राचे वाचन प्रा. अलका सपकाळ यांनी केले.
जाहिरात