गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ज्ञानात भर घालणारी अन् मनोरंजनापलिकडे जाणारी साहित्यसंपदा!
करम प्रतिष्ठान आयोजित पहिल्या ग्रंथसन्मान सोहळ्यात मान्यवरांचे गौरवोद्गार.
पुणे : गझलकारांची संख्या वाढविण्यात; गझलेची लोकप्रियता वाढविण्यात आणि बिघडविण्यातही सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. अशा काळात गझल या विषयावर जाणकार, मर्मज्ञ व्यक्तींनी अभ्यासपूर्ण विवेचन करणे फार गरजचे होते. वर्षा कुलकर्णी, वैभव कुलकर्णी यांचे ग्रंथ कवी आणि रसिकांच्या ज्ञानात भर घालणारे आहेत. मनोरंजनापलिकडे जाणारी ही साहित्यसंपदा आहे, अशा शब्दांत प्रमुख वक्त्यांनी कवी, गझलकारांच्या लेखनाचा सन्मान केला.
वर्षा बेंडीगेरी-कुलकर्णी लिखित ‘वृत्तबद्ध कविता – कला व शास्त्र’ आणि वैभव वसंतराव कुलकर्णी लिखित ‘गझल – आकृती व आशय’ या मराठी साहित्यातील अलीकडच्या काळातील महत्वाच्या ग्रंथांचा सन्मान सोहळा करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 3) पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
करम प्रतिष्ठान आयोजित ग्रंथ सन्मान सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) प्रज्ञा महाजन, वैभव कुलकर्णी, ॲड. प्रमोद आडकर, भूषण कटककर, वर्षा कुलकर्णी.
या वेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, गझलकार अनिल आठलेकर यांनी ग्रंथांविषयी भावना व्यक्त केल्या. आडकर यांच्या हस्ते लेखकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेला हा पहिला ग्रंथसन्मान सोहळा होता.
साहित्यात समृद्ध पिढी निर्माण होण्याची क्षमता : भूषण कटककर
‘वृत्तबद्ध कविता – कला व शास्त्र’ या ग्रंथाविषयी बोलताना भूषण कटककर म्हणाले, काव्य व पद्य याचे अतूट नाते आहे. कवितेला व गझलेला मूळ परंपरेशी जोडणारे ग्रंथ निर्माण करणे हे वर्षा कुलकर्णी व वैभव कुलकर्णी यांचे कार्य अलौकिक आहे. यातून नवोदित कवींची समृद्ध पिढी तयार होण्याची क्षमता आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, तंत्रबद्ध काव्याचा नेमका आनंद घेण्यासाठी हे ग्रंथ मोलाचे आहेत. गझल लेखनात आढळणाऱ्या तृटी दूर कशा करायच्या याची उत्तरे वैभव कुलकर्णी यांच्या ग्रंथांतून मिळत आहेत. वर्षा कुलकर्णी यांचा ग्रंथ वाचल्यांनतर आपण कुठे आहोत हे नवोदित कवींना निश्चित समजेल. दोन्ही ग्रंथ ज्ञानात भर घालणारे असून नवोदितांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘गझल – आकृती व आशय’ या ग्रंथाविषयी बोलताना अनिल आठलेकर म्हणाले, तंत्र म्हटले की क्लिष्ट भाषा असा अनेकांचा समज असतो. आपल्या लेखनातून प्रस्थापित आणि नवोदित लेखकांना नेमक्या शब्दात कानपिचक्या दिल्या आहेत. गझलकारांची संख्या वाढत असताना तोंडदेखली स्तुती टाळून अभ्यासपूर्ण विवेचन फार महत्वाचे होते, ते या ग्रंथाद्वारे झाले आहे.
वर्षा कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी यांनी पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त केले. सन्मानपत्राचे वाचन निरुपमा महाजन आणि प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जगताप यांनी केले. प्रज्ञा महाजन यांनी प्रास्ताविकात पहिल्या ग्रंथसन्मान सोहळ्याविषयी माहिती दिली.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झालेल्या निमंत्रितांच्या कवी-गझल संमेलनात मिलिंद छत्रे, दास पाटील, स्वप्नील शेवडे, वैशाली माळी, सानिका दशसहस्र, वासंती वैद्य, शैलजा किंकर, अश्विनी देशपांडे, रेखा कुलकर्णी, माधुरी डोंगळीकर यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.
जाहिरात